- जाहिरात -spot_img
breaking news

जुगार अड्ड्यावर छापा; फ्लेसवरून राडा, महिलेचा विनयभंग

दोघांना रंगेहाथ पकडले | रकमेसह मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील मल्हार चौकात सुरू असलेल्या बिंगो जुगाराच्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हवालदार भरत मारुती बुधवत यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ९ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास मल्हार चौकातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम बिंगो जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.

या कारवाईत कौशिक रत्नाकर रसाळ (जुगार खेळविणारा) आणि संकेत संजय आनंत्रे (जुगार खेळणारा) हे दोघे पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १० हजार ३०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याव्यतिरिक्त, जुगारासाठी वापरले जाणारे एलईडी स्क्रीन, माऊस, किबोर्ड, संगणक संच आणि बिंगो आकड्यांचे कापड असा एकूण १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

फ्लेसवरून राडा; दोघांवर गुन्हा
अहिल्यानगर: शहरातील चितळे रोड परिसरात असलेल्या मिरावली दर्गा येथे फ्लेस बोर्ड लावण्यावरून झालेल्या वादानंतर दोन तरुणांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत रिक्षा आणि दुकानाची तोडफोड करण्यात आली असून, तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एजाज शेख (रा. चितळे रोड) आणि अतुल दिलीप चुत्तर (रा. कोहीनूर गार्डन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील आरोपींनी फ्लेस बोर्ड लावण्यावरून वाद घातला आणि त्यानंतर आपापसात झुंज देत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. यावेळी तिथे उपस्थित असलेले पोलीस हवालदार रावसाहेब शंकर खेडकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत वाद चालूच ठेवला. याप्रकरणी पोलीस हवालदार रावसाहेब खेडकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एजाज शेख आणि अतुल चुत्तर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक; कुठे कुठे टंचाई, पहा

मुलांच्या भांडणातून महिलेचा विनयभंग
अहिल्यानगर : शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील कोठला भागात राहणार्‍या एका महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना आठ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. परिसरातील काही लहान मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी पीडितेच्या घरी जाऊन वाद घातला. या वेळी आरोपी शहेबाज रज्जाक शेख आणि राजीक शेख यांनी पीडितेला शिवीगाळ करत लाथाबुयांनी मारहाण केली. आरोपी शहेबाज याने पीडितेच्या अंगावर धावून जात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर आरोपींनी पीडितेच्या कपड्यांना ओढून त्यांना धक्काबुक्की केली.आरोपींनी तुम्ही कोठल्यात कसे राहता, ते पाहतोच अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ