अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तोफखाना पोलीस स्टेशनच्या वतीने बोल्हेगाव परिसरामध्ये चालू असलेल्या दारू अड्ड्यांवर अचानकपणे छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल 6 दारू अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांमध्ये धाबे दणाणले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, पोलीस कर्मचारी दिनेश मोरे आणि हेमंत झिने हे ड्युटीवर असताना गावठी हातभट्टी दारुची त्यांना गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेतले आणि खाजगी वाहनाने तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांची चाहूल लागताच दारू खरेदी करण्यासाठी उभे असलेले ग्राहक तिथून पळून गेले. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवून दारू विकणाऱ्या मुख्य आरोपीला जागीच ताब्यात घेतले. राम भाऊ खलाटे (वय 42, रा. मोर्यापार्क, बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन ड्रममध्ये भरलेली एकूण 50 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली. या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 5 हजार रुपये आहे.पोलिसांनी घटनास्थळावरून रासायनिक तपासणीसाठी दारूचा नमुना राखून ठेवला असून, उर्वरित सर्व बेकायदेशीर मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच नष्ट केला आहे. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड यांच्या तक्रारीवरून आरोपी राम भाऊ खलाटे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
भांडण सोडविणे भोवले
अहिल्यानगर: शहरातील नालेगाव परिसरातील टांगेगल्ली येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मोठ्या मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मित्राचे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीवर आरोपींनी रागाच्या भरात फरशीच्या तुकड्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. या प्रकरणाची नोंद कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. योगेश रोहीदास दातरंगे (वय 34 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. नालेगाव, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रुख्मिणी ऊर्फ चांदणी रायक्वार, अशोक रायक्वार आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.29 जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टांगेगल्ली परिसरात फिर्यादी यांचे मित्र संदीप शिर्के आणि आरोपी यांच्यामध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी योगेश दातरंगे तेथे गेले असता, आरोपींनी त्याचा तीव्र राग मनात धरला. आरोपींनी मारहाण, शिवीगाळ केली.










