- जाहिरात -spot_img
breaking news

सुपारी देऊन मुलीनेच केली आईची हत्या; वर्षभरापूर्वी वडिलांनाही संपवल्याचा संशय, धक्कादायक कारण समोर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी नीरज शर्मा या महिलेची हत्या तिच्याच मुलीने केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाच्या तपासाला आता नवीन वळण लागले आहे. नीरज शर्मा यांचे पती आणि आयुषीचे वडील विजय शर्मा यांचा २०२५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप आयुषीच्या मामाने केला असून याचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आई नीरज शर्मा यांच्या हत्या प्रकरणात आयुषीला अटक झालेली आहे. कौटुंबिक मालमत्ता आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आयुषीने हा कट रचल्याचे समोर आले. आता वडिलांचीही अशाचप्रकारे हत्या केली होती का? असा संशय नातेवाईकांनी उपस्थित केला असून पोलीस या दाव्याचा तपास करत आहेत.

२३ वर्षीय आयुषी शर्माला अटक झाल्यानंतर आता या प्रकरणात ही नवी माहिती समोर आली आहे. आयुषीचा चुलत भाऊ बलराम उर्फ रवी या प्रकरणात सहआरोपी असून तो फरार आहे. आयुषीने रवी आणि इतर आरोपींच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

आईचा खून कसा केला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात कनिष्ठ लिपिक असलेल्या नीरज शर्मा यांचा ३ जुलै रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. भरधाव वेगात आलेल्या एका स्कॉर्पिओने नीरज शर्मा यांना धडक देत चिरडले होते. वरकरणी हा अपघात असल्याचा भासवायचा असा आरोपींचा कट होता. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासल्यानंतर त्यांना वेगळाच संशय आला. यानंतर केलेल्या तपासात आयुषीसह सात जणांना अटक करण्यात आली.

वडिलांचाही खून केल्याचा आरोप
नीरज शर्मा यांचे भाऊ आणि आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी विजय शर्मा यांच्या मृत्यूची चौकशी करावी, या मागणीसाठी पोलीस आणि न्यायालयात धाव घेतली आहे. राकेश शर्मा यांनी केलेल्या आरोपानुसार, राजस्थान उच्च न्यायालयात लिपिक असलेले विजय शर्मा गंभीर आजारातून बरे होत होते. मात्र आयुषीने त्यांना पुढील वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखले.

हे सुद्धा वाचा :  ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला;

राकेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषीने तिचा चुलत भाऊ बलरामबरोबर मिळून कट रचला होता. वडिलांना चांगले उपचार मिळवून देऊ असे सांगून तिने विजय शर्मा यांना अज्ञात स्थळी हलवले. तसेच त्यांचा ठावठिकाणा सांगण्यासही विरोध केला. कुटुंबाने जाब विचारल्यानंतर जयपूरच्या निविक रुग्णालयात ते उपचार घेत असल्याचे तिने सांगितले.

नातेवाईकांनी निविक रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता डॉक्टरांनी सांगितले की, विजय शर्मा यांचे ९० टक्के शरीर प्रतिसाद देत नाही. यानंतर विजय शर्मा यांना आयुषी घरी घेऊन गेली. जिथे त्यांचा मृत्यू झाला.

राकेश यांनी पुढे आरोप केला की, आयुषी आणि बलराम यांनी विजय शर्मा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी नेऊन अंत्यसंस्कार केले. मृत्यूनंतर लगेचच आयुषीने वडिलांची नोकरी अनुकंपा तत्वावर मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला. तसेच कुटुंबाची मालमत्ता आपल्या नावावर व्हावी, असाही आग्रह धरला.

आईला दिली होती धमकी
मालमत्तेच्या हस्तांतरावरून झालेल्या भांडणात आयुषीने एकदा आईला धमकी दिली होती, असाही आरोप राकेश शर्मा यांनी केला. वडिलांची फीडिंग ट्यूब काढून त्यांना ज्याप्रकारे मारले, तसेच तुलाही मारून टाकू, ते खूप सोपे आहे, अशी धमकी आयुषीने दिली होती. राकेश शर्मा म्हणाले की, २०२४ मध्ये विजय शर्मा यांना ब्रेन हॅम्रेज झाल्यानंतर आयुषीने त्यांच्यावरील उपचारांचा तपशील लपवला होता. तसेच एप्रिल २०२५ मध्ये रुग्णालयात दाखल करण्याआधी त्यांना एका अज्ञात स्थळी लपवले होते.

७ लाखांची सुपारी देऊन आईची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज शर्मा (वय ४५) या आपल्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये सोडून घरी परतत असताना सुमारे १३० किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्या १०० फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक गाडीसह पळून गेला. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान कौटुंबिक कट आणि भाडोत्री मारेकऱ्यांचा सहभाग उघडकीस आला. आयुषीने तिचे काका मोहन स्वरूप आणि चुलत भाऊ बलराम उर्फ रवी यांच्यासोबत मिळून आईला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी भरतपूर येथील हेमंत शर्मा याला ७ लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपींनी सुरुवातीला भाड्याने घेतलेल्या थार गाडीतून नीरज यांची रेकी केली, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर महिनाभर पाळत ठेवून अखेर स्कॉर्पिओ कारने हा हल्ला करण्यात आला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ