आमली पदार्थांविरोधात कारवाई करून युवा पिढी वाचवा…
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जिल्ह्यात व शहरात सर्वच भागांमध्ये सर्रास अमली पदार्थांची विक्री होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. तरुणांच्या व्यसनाधीनतेमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेही घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाचे भविष्य असणारी तरुण पिढी अशी वाया गेली तर देशाचे भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. वाढत्य व्यसनाधीनतेमुळे जिल्ह्याचा उडता पंजाब करू नका. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व अवैध धंद्यांवर आपले सुदर्शन चक्र त्वरित फिरवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली.
अहिल्यानगर शहर व जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या अमली पदार्थांच्या विक्री विरोधात व तरुणांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीतेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाने त्वरित याविरोधात संबंधितांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यावेळी उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दारातच धरणे आंदोलन करत ठिय्या दिला. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सुमारे दोन तास आंदोलन केले. या आंदोलनात शहरातील व जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला पदाधिकारी, युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवाशक्ती बचाओ… देश बचाओ…, अमली पदार्थ हद्दपार झालेच पाहिजे… दारू बंदी ,हप्ते बंदी झालीच पाहिजे.. अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला.

यावेळी पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम त्वरित सुरू करू असे आश्वासन देऊन संबंधितांवरकडक कारवाई करू असे सांगितले.
यावेळी अनिल मोहिते म्हणाले, अमली पदार्थ सहज कुठेही टपऱ्या टूपऱ्यांवर उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केली असून अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. वाढत्या व्यसनाधिनतेमुळे जिल्ह्याचा उडता पंजाब होतो की काय असा धोका निर्माण झाला आहे. नव्या पिढीला वाचवण्यासाठी ही व्यसनाधीनता कमी करणे आवश्यक आहे. अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने शाळा महाविद्यालयांमध्ये बैठका घ्या. तसेच पान टपऱ्यांची तपासणी करावी. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसे अमली पदार्थ विरोधात विशेष कारवाई करण्याचे आदेश देऊन पथक निर्माण केले आहेत तसेच आपल्या जिल्ह्यातही करावे, अशी मागणी करून अमली पदार्थ व अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी आपले सुदर्शन चक्र फिरवावे व हे धंदे बंद करावेत अन्यथा भारतीय जनता पार्टी शांत न बसता याहून अधिक तीव्र आंदोलन करेल व प्रसंगी कायदाही हातात घेईल, असा इशारा दिला.
दिलीप भालसिंग म्हणाले, पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीमुळे जिल्ह्यात अवैध धंदे व आमली पदार्थांची विक्री जोमात आहे. हे अवैध धंदे त्वरित बंद झाले पाहिजे. मात्र पोलीस प्रशासनच अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. हे चुकीचे असून त्वरित थांबले पाहिजे. भाजप आता शांत बसणार नाहीये.
आंदोलनाचे प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांनी केले. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिया जानवे, युवा मोर्चा अध्यक्ष ऋद्रेश अंबाडे, नगरसेवक उदय कराळे, राहुल शिंदे, बाबासाहेब सानप, वैशाली चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.










