- जाहिरात -spot_img
breaking news

स्टेट बँक चौकात चालकावर जीवघेणा हल्ला; शेतातील सोलर कॅमेऱ्याची तोडफोड, शेततळ्याचा कागद चोरीला

दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील स्टेट बँक चौक परिसरात एका चालकावर दोन अज्ञात व्यक्तींनी लाकडी काठी व लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव अंबादास बडे (वय ४०, व्यवसाय – चालक, सध्या रा. सारसनगर, अहिल्यानगर) हे २४ जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास स्टेट बँक चौक येथून घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना “थांब, थांब” असे म्हणत शिवीगाळ केली.

यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीसमोर स्वतःची गाडी आडवी लावून लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर व डाव्या हातावर मारहाण केली. मारहाणीमुळे नामदेव बडे हे खाली पडल्याने आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी केली. तसेच एका आरोपीने लोखंडी गजाने डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. जखमींवर खाजगी हॉस्पिटल तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ पी. ए. बारगजे करीत आहेत.

शेतातील सोलर कॅमेऱ्याची तोडफोड;
बाप-लेकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
अहिल्यानगर : देहरे शिवारातील एका शेतात अनधिकृतरित्या प्रवेश करून सोलर कॅमेऱ्याची तोडफोड केल्याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनमोहन दिनकर घोडके (वय 40, व्यवसाय-नोकरी, रा. पंपिंग स्टेशन रोड, भुतकरवाडी, सावेळी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पुष्पा अशोक जाधव व त्याचा मुलगा आदेश अशोक जाधव (दोघे रा. देहरे, ता. जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी दुपारी देहरे येथील गट क्रमांक 191/1/1 मधील शेतात ही घटना घडली. आरोपींनी शेतात अनधिकृत प्रवेश करून तेथे संरक्षणासाठी बसविण्यात आलेल्या सोलर कॅमेऱ्याची तोडफोड केल्याचा आरोप आहे. आदेश जाधव याने हातातील काठी खाली ठेवून दगड उचलत सोलर कॅमेऱ्यावर दगडफेक केली. तसेच कॅमेऱ्याच्या पोलजवळ जाऊन पुन्हा दगड मारून कॅमेऱ्याचे नुकसान केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत सोलर कॅमेऱ्यासह सोलर प्लेटचेही नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  पाकिस्तानी गँगस्टरशी संबंध; श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; कोठला परिसरात पोलिसांचा छापा..

तरुणाला घरी बोलावून बेदम मारहाण; चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
अहिल्यानगर : एका तरुणाला घरी बोलावून लाकडी दांडके, लोखंडी गज तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रवीण दत्तात्रय गुंड (वय ३७, रा. पोखर्डी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्तात्रय जाधव, संभा दत्तात्रय जाधव, सुनिल सुसे व अक्षय सुनिल सुसे (सर्व रा. पोखर्डी, ता. जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सुसेवस्ती येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना आरोपी दत्तात्रय जाधव यांनी त्यांना मोबाईलवर फोन करून पोखर्डी येथील घरी बोलावून घेतले. तेथे “माझ्या भाचीला फोन का करतो?” असा जाब विचारण्यात आला. यावेळी फिर्यादी यांनी “तुम्ही समजता तसे काही नाही. ती मला फोन करते म्हणून मी तिला फोन करतो,” असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने हात, पाय व पाठीवर मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनी लोखंडी गज तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सारोळाबद्दी येथे शेततळ्याचा कागद चोरीला
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील सारोळाबद्दी गावातील शेतातून शेततळ्याचा कागद चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भारत बबन बोरुडे (वय ५०, व्यवसाय – नोकरी, रा. ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २५ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारोळाबद्दी येथील शेत गट क्रमांक २०३ मधील शेततळ्यात बसविण्यात आलेला सुमारे ७० हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा केपी टेक्स करांडे प्लास्टिक प्रा. लि. कंपनीचा शेततळ्याचा कागद अज्ञात चोरट्याने चोरी करून नेला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ सरोदे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  युवाशक्तीच्या बळावर भाजप अधिक सक्षम करू ; महाडिक

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ