- जाहिरात -spot_img
breaking news

मुंबईत कोसळधार; जिल्ह्यात संततधार, भंडारदरा परिसरात पावसाचा कहर… ; दोन दिवस अलर्ट…, पहा जिल्ह्यातील वस्तुस्थिती

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. जोरदार वारे व मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याची घटना घडली. लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 670 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. आज सकाळपासून नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असून, पावसाची रिपरिप कायम आहे. मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला असून, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने भारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर स्लॅब मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशातच मुसळधार पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवरही परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. शहरात सकाळी झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले.

पारनेरमध्ये तीन दिवसांपासून रिपरिप
खरीप पिकांना जीवदान; मोठ्या पावसाची प्रतीक्षा
सुपा / पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी सर्वदूर संततधार पाऊस होत असल्याने बळीराजासह नागरिक पशू पक्षी जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न माग लागताना दिसत आहे. या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जून महिना कोरडा गेला असून जुलै महिन्याचा एक आठवडा उलटूनही अद्याप काही ठिकाणी मोठ्या पावसाने हजेरी लावली नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

मे, जुन महिन्यात पारनेर तालुक्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचे गणित बिघडले होते. परंतु जुनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्याच दिवसापासून पारनेर तालुक्यात कमी जास्त प्रमाणात का होईना पाऊस पडत आहे. शनिवार दि. 4 रविवार व सोमवारी देखील दिवसभर तालुक्यात कमी जास्त प्रमाणात का होईना पण दिवसभर संततधार पाऊस पडला.
पारनेर तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यात जुन अखेर सरासरी 57 मिली मिटर पाऊस झाला असुन जुलै महिन्यात तालुक्यात सरासरी 1 ते 3 जुलै दरम्यान 5.6 मिलीमिटर पाऊस नोंदवला गेला असल्याचे कृषी अधिकारी घुले यांनी सांगितले. पारनेर तालुक्यात जुन 2026 अखेर 5340 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या असुन यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, मुग, उडीद, तुर, सह चारा पिक मका, कडवळ यांचा समावेश आहे.

शनिवार रविवार व सोमवार सलग तीन दिवस दिवसभर पारनेर तालुक्यात संततधार पाऊस पडला असुन जाणकारांच्या मते या पावसाचे प्रमाण 15 ते 20 मिलीमीटर असु शकते. या पावसाने चालु पिकांना मोठा फायदा होणार आहे. अनेक ठिकाणी थांबलेल्या पेरण्या माग लागू शकतात. तसेच लांबलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची मोठी समस्या उभी राहिली होती. मागील चार सहा दिवसापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू लागल्याने बळीराजा सुखावलेला दिसत आहे.

घराच्या भिंती कोसळल्या
पारनेर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. या भीज पावसामुळे चिकणेवाडी, सावरगाव येथील शेतकरी पुंडलिक गोविंद चिकणे यांच्या राहत्या घराच्या दगडी भिंती कोसळल्या आहेत. तसेच इतर भिंतींना तडे गेले असून मोठे नुकसान झाले आहे.


भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा कहर;
भंडारदरा धरण 35% भरले | निळवंडेत पाण्याची आवक
राजूर | नगर सह्याद्री-
उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने तांडव घातले आहे. जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या घाटघर येथे तब्बल सहा इंच पावसाची नोंद झाली असून संपूर्ण घाटघर गाव धुक्यामध्ये हरवले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 3899 दशलक्ष घनफुटावर पोहचल्याने भंडारदरा धरण 35.32 टक्के भरले आहे. निळवंडे धरणाचा पाणी साठा 1607 दशलक्ष असून 19.18 टक्के भरले आहे.

हे सुद्धा वाचा :  शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणती कामे होणार पहा

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व परीसरात गत तीन दिवसांपासून मुसळधार पावसाचे तांडव सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसाने आदिवासी बांधवांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. आदिवासी बांधवांवर आपली पाळीव जनावरे घरातच बांधण्याची वेळ आली आहे. पावसामुळे हवेत गारठा तयार झाला असुन घराघरांमध्ये शेकोट्या पेटल्या आहेत. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे काळ्या कातळावरुन पांढऱ्या शुभ्र पाण्याचे धबधबे कोसळत असून ओढे-नाले दुथडी भरून वाहते झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. भंडारदरा परीसरात यावषचा सर्वात जास्त पावसाची नोंद घाटघर येथे झाली.

घाटघरला सहा इंच पाऊस
गत 24 तासांत भंडारदरा येथे 72 मिमी, घाटघर येथे 140 मिमी, पांजरे 86 मिमी, रतनवाडी येथे 113 मिमी, वाकी 66 मिमी पाऊस नोंदविला गेला. कळसुबाई शिखरावर पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंती नदीत पाणी वाढत असल्याने वाकी तलावातही पाण्याची आवक सुरू आहे.

निघोजला पावसाची बॅटिंग
निघोज | नगर सह्याद्री
निघोज आणी परिसरातील गावांमध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आंनद व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री दहा ते सकाळपर्यंत पाऊसाने जोरदार बॅटिंग केलेी. सध्या होत असलेल्या संततधार पाऊस खरीप पिकांना जीवदान देणारा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निघोज आणी परिसरातील दहा ते बारा गावांना कुकडी डावा कालव्याच्या पाण्याचा मोठा आधार असला तरी कुकडी प्रकल्प पाणी साठ्यात हा पाऊस असाच पडत राहिल्यास कुकडी प्रकल्पात पाणी साठा वाढणार असून त्यांचा त्याचा फायदा पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांना होणार आहे.

सुपा चौकासह बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप
गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी, वाहन चालकांची कसरत
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात सोमवारी झालेल्या संततधार पावसाने शेतकरी, कंपनी कामगार, शालेय विद्याथ यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुपा शहराला सोमवारी पहाटेपासूनच पावसाने झोडपून काढले. यात दुध व्यवसायिक शेतकरी, कंपनी कामगार तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली.

पारनेर तालुक्यात तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, या पावसाने सुपा येथील तालुका दूध संघापासून बाजारतळाचे सर्व पाणी मेन चौकात येते. येथील ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून ते स्मशानभूमी परिसरात सोडण्यात आले आहे, मात्र हे पाईपच जाम झाल्यामुळे हे पाणी थेट नगर – पुणे महामार्गावर आल्याने सुपा मेन चौक व बस स्थानक परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सुट्टीच्या दिवशी दर शनिवार, रविवार सुपा येथील मेन चौक ते शासकीय विश्रामगृह येथे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. महामार्गालगत बेकरेी, हारांचे दुकाने थाटण्यात आल्याने ग्राहक रस्त्यावरच आपली गाडी पार्क करत असल्याने येथे वाहनांची मोठी कोंडी होते. त्यातच सोमवारी झालेल्या संततधार पावसामुळे या कोंडीत आणखी भर पडली. मेन चौकात गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालकांना त्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती. बसस्थानक परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साठल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.

हे सुद्धा वाचा :  हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण ...नेमकं कारण काय

‌‘मुळा‌’त पाण्याची आवक
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील व परिसरात रात्री पासून पावसाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे मुळा धरणात पाण्याची नव्याने आवक सुरू झाली आहे.

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी होत असलेल्या पावसामुळे नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे कोतुळकडील मुळा नदीतून धरणाकडे नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या मुळा धरणात 24.70 टक्के एकूण पाणीसाठा, तर उपयुक्त साठा केवळ 9 टक्के आहे. मात्र नव्याने पाण्याची आवक 6,260 क्युसेफने सुरू झाल्याने नगर शहरासह राहुरी, नेवासा, पाथड आणि शेवगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुळा धरणात नव्याने आवक सुरू झाल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत पाणी साठा अल्प प्रमाणात असल्याने चिंता निर्माण झाली होती.

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ
नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा | रेड अलर्ट जारी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने तातडीचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळी वाढत आहे. दि. 6 जुलै सकाळी 10 वाजता भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून 24,049 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यास दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
नदीकाठावरील गावातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यास ६ व ७ जुलै २०२६ रोजी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून या कालावधीत अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून संभाव्य जीवितहानी व वित्तीय हानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिते यांनी केले आहे.

अहिल्यानगर, पुणे व नाशिक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पर्जन्य झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा व गोदावरी नद्यांवरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून २७ हजार ८४७ क्युसेक, तर गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुढील पर्जन्यमानानुसार या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठील गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मेघगर्जना, विजांचा कडकडाट अथवा वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये व सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. टॉवर, ध्वजस्तंभ, विजेचे खांब, विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), धातूचे कुंपण तसेच लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे. विद्युत प्रवाह असण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही वस्तूस स्पर्श करणे टाळावे. मेघगर्जना सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळावा. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास उकिडवे बसून दोन्ही हातांनी कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क राहील याची काळजी घ्यावी. वादळी वाऱ्यामुळे झाडे अथवा जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता असल्याने अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. तसेच ट्रॅक्टर उलटणे किंवा शेतीची अवजारे हाताळताना अपघात होणार नाहीत, यासाठी विशेष सतर्कता बाळगावी.

हे सुद्धा वाचा :  महामानवास अभिवादनासाठी उसळला जनसागर; शहरात पोलीस अलर्ट

वादळी वारे, पाऊस अथवा गारपीट यांमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या अथवा आणण्याचे नियोजन असलेल्या शेतीमालाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जनावरेही सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

धरण, नदी अथवा कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरण, नदी अथवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी अथवा छायाचित्रे काढणे टाळावे.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मदतीसाठी जवळच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व ०२४१-२३५६९४० तसेच ११२ व १०७७ या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.

श्रीगोंदा तालुक्यामध्ये वरुणराजाची दमदार कृपा
पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य | उकाड्यापासून नागरिकांची झाली सुटका
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर अखेर सोमवारी पहाटे श्रीगोंदा तालुक्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली. जोरदार पावसामुळे संपूर्ण तालुक्याला दिलासा मिळाला असून नागरिकांसह शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला, तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

पावसाच्या सरींमुळे शहरातील प्रमुख रस्ते तसेच सखल भागात काही ठिकाणी पाणी साचले अनेक ठिकाणी निसर्ग पुन्हा एकदा बहरल्याचे चित्र दिसून आले.
खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बाजरी, मका, तूर, कपाशी आदी पिकांना या पावसामुळे मोठे जीवदान मिळणार असून आधीच पेरणी झालेल्या शेतांतील पिकांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तालुक्यात काही भागात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकरी प्रतीक्षेत होते. या पावसानंतर उर्वरित पेरण्यांनाही वेग येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या पाणीटंचाईवरही या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विहिरी, शेततळी आणि लहान जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वरुणराजाच्या दमदार आगमनामुळे श्रीगोंदा तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील जनजीवन झाले विस्कळीत; विद्यार्थ्यांची तारांबळ; वाहतूक मंदावली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
शहरात सोमवारी पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळच्या वेळेत पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला, तर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

शाळा सुरू होण्याच्या वेळेतच पाऊस चालू असल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक विद्याथ रेनकोट व छत्री घेऊन शाळेत पोहोचले, तर लहान मुलांना पालकांनी स्वतः शाळेत सोडण्यासाठी धावपळ केली. काही ठिकाणी शाळेबाहेर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागले. शहरातील सखल भाग, चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. कार्यालयीन वेळ असल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांनाही पावसाचा सामना करत प्रवास करावा लागला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ