खासदार लंके व सभापती बेलकरांकडे करणार पाठपुरावा
पारनेर | नगर सह्याद्री
टाकळी ढोकेश्वर येथे प्रस्तावित उपबाजार समितीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर आता पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील खडकवाडी गावातील ग्रामस्थांनी उपबाजार समितीसाठी पुढाकार घेतला आहे. खडकवाडी येथे उपबाजार समिती स्थापन व्हावी, अशी आग्रही मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत असून यासाठी बाजार समितीला पाच एकर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक श्रीरंग रोकडे यांनी खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगितले आहे.
या विषयावर स्थानिक ग्रामस्थांसोबत तसेच शेतकऱ्यांबरोबर त्यांची चर्चा झाली आहे. खडकवाडी हे पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वेगाने विकसित होत असलेले मध्यवत बाजारपेठेचे ठिकाण असून या गावाचा परिसरातील जवळपास 50 गावांशी दररोज संपर्क असतो. त्यामुळे या ठिकाणी उपबाजार समिती उभारल्यास शेतकऱ्यांसाठी तसेच व्यापाऱ्यांसाठी मोठी सुविधा निर्माण होईल, असे मत श्रीरंग रोकडे यांनी व्यक्त केले.
रोकडे यांच्या पत्नी मेघा रोकडे या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत. शेतकरी वर्गाशी सातत्याने संपर्क असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खडकवाडी येथे उपबाजार समिती स्थापन करण्यास कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.खडकवाडी हे साकुर पठार भागासह म्हैसगाव, देसवडे, मांडवे, पोखरी, पवळदरा, म्हसोबा झाप, वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, पळसपूर, कातळवेढा, वासुंदे, बोकनकवाडी, शिक्री आदी गावांसाठी मध्यवत ठिकाण मानले जाते. या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर वाटाणा, टोमॅटो, कांदा, मिरची यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.
त्यामुळे या भागातील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आळेफाटा, पारनेर आणि अहिल्यानगर बाजारपेठांकडे केली जाते.जर खडकवाडी येथे उपबाजार समिती स्थापन झाली, तर शेतकऱ्यांना आपल्या परिसरातच शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध होईल. वाहतूक खर्चात बचत होण्याबरोबरच वेळेचीही बचत होईल. तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. ग्रामीण बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खडकवाडीला यामुळे नवी आर्थिक ओळख मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, खडकवाडी येथे उपबाजार समिती स्थापन करण्याची मागणी आता परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने खासदार निलेश लंके तसेच पारनेर बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच हा विषय बाजार समितीच्या आगामी मासिक बैठकीतही मांडला जाणार असल्याची माहिती श्रीरंग रोकडे यांनी दिली.उपबाजार समितीच्या संभाव्य ठिकाणांबाबत चर्चा सुरू असताना खडकवाडी ग्रामस्थांनी दाखविलेला पुढाकार आणि जागा उपलब्ध करून देण्याची तयारी यामुळे आता या मागणीकडे बाजार समिती प्रशासनाचे लक्ष लागले आहे. खडकवाडीच्या दाव्याला कितपत प्राधान्य मिळते, याकडे संपूर्ण उत्तर पारनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.










