मुंबई । नगर सह्याद्री –
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या धो-धो पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले ओसंडून वाहत असून अनेक भागांत पूरपरिस्थिती ओढवली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या गजबजलेल्या महानगरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पुढील काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज सातारा आणि पुणे जिल्ह्यांवर पावसाचे मोठे संकट आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनातर्फे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, राज्याची राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईसाठी आज ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही आज तुफानी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुण्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून २,७०० क्युसेस वेगाने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणच नव्हे, तर विदर्भातील अनेक भागांतही आज पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, मान्सून आता गुजरात, अरबी समुद्र आणि राजस्थानच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. मान्सूनची ही वाटचाल पाहता, पुढील काही दिवसांत केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात मान्सूनचा जोर कमालीचा वाढणार आहे. राज्यातील या अतिवृष्टीमुळे प्रशासनाने गडकिल्ले, पर्यटन स्थळे आणि धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. एकंदरीत, संपूर्ण राज्य सध्या पावसाच्या छत्राखाली असून प्रशासनाचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.
पावसाचा जोर कायम! नद्यांना पूर, अलर्ट जारी
राज्यातील अनेक भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना आज देखील अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर आज देखील ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तुमसर तालुका आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.
पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
यंदा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला. मान्सून उशिरा आल्यामुळे यंदा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण गेल्या ५ दिवसांपासून पाऊस राज्यात धुमाकूळ घालत आहे. या पाच दिवसांत मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे. संपूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडणार होता तेवढा पाऊस १ ते ६ जुलै या कालावधीत पडला. राज्यात पाऊसाचा कहर सुरूच आहे. अशाच हवामान खात्याने पुढचे ६ दिवस महत्वाचे असल्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात ८ जुलै ते १२ जुलै या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
८ जुलै – येलो अलर्ट – नुंदरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, पुणे.
येलो अलर्ट – ठाणे , मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक
रेड अलर्ट – पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट.
९ जुलै – येलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर,
रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नाशिक
घाट, पालघर.
ऑरेंज अलर्ट – सातारा घाट, पुणे घाट.
१० जुलै-
येलो अलर्ट – नागपुर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
११ जुलै-
येलो अलर्ट – नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.
१२ जुलै-
येलो अलर्ट – नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, अमरावती.










