- जाहिरात -spot_img
breaking news

महागाईच्या संकटात जनतेला दिलासा द्या; खासदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पारनेर / नगर सह्याद्री –
देशभरात वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात खासदार नीलेश ज्ञानदेव लंके यांनी राज्य सरकारकडे आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज तात्काळ रद्द करावा, अशी मागणी खासदार लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

खासदार लंके यांनी पत्रात म्हटले आहे की, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम थेट सर्वसामान्य जनतेवर होत आहे. खाद्यतेल, भाजीपाला, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून महागाई आणखी तीव्र होत आहे.

केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्या जात असून, मागील दहा दिवसांत सलग चौथ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलमध्ये २ रुपये ६१ पैसे, तर डिझेलमध्ये २ रुपये ७१ पैशांनी वाढ झाली असल्याचे खासदार लंके यांनी नमूद केले आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल १११.१२ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९६.८६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध असल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकार पेट्रोलवर सुमारे २५ टक्के व्हॅट आणि १०.१२ रुपये प्रति लिटर सरचार्ज आकारत असल्याचे, तर डिझेलवर सुमारे २४ टक्के व्हॅट आणि ३ रुपये प्रति लिटर सरचार्ज आकारला जात असल्याचे लंके यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. हे कर आणि अधिभार रद्द करण्यात आल्यास पेट्रोल-डिझेलचे दर थेट ७० ते ८० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

महागाईमुळे शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक, वाहनधारक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संवेदनशीलता दाखवत नागरिकांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :  महिला आरक्षणावरून राजकारण तापले, आरक्षण नव्हे, संरक्षण हवे

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द करून सामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी विनंती खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ