जामखेड तालुक्यात 29 जूनअखेर 109.3 मिमी पावसाची नोंद
जामखेड | नगर सह्याद्री
यंदाच्या मान्सूनने उशिराने हजेरी लावली असली, तरी त्याचा लहरी स्वभाव शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. काही भागांत दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळतो, तर त्यानंतर आठवडाभर पावसाचा पूर्ण खंड पडतो. या बदलत्या पावसाच्या पॅटर्नमुळे जामखेड तालुक्यातील बळीराजा मोठ्या संभ्रमात सापडला असून, खरीप हंगामाचे नियोजनच विस्कळीत झाले आहे. पेरणीसाठी आवश्यक ओलावा किती दिवस टिकेल, याची खात्री नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीचा निर्णय पुढे ढकलला आहे.
29 जून 2026 अखेर जामखेड तालुक्यात सरासरी 109.3 मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण अपेक्षित सरासरीच्या सुमारे 82 टक्के आहे. मात्र आकडेवारी समाधानकारक दिसत असली, तरी पावसाचे वितरण अत्यंत असमान असल्याने त्याचा शेतीला अपेक्षित लाभ होत नसल्याचे चित्र आहे. काही भागांत अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर अनेक गावांमध्ये अजूनही दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
सध्या खरीप हंगामातील पेरणीचा सर्वात महत्त्वाचा कालावधी सुरू आहे. मात्र पावसाचा अंदाज निश्चित नसल्यामुळे शेतकरी जोखीम घेण्यास तयार नाहीत. घाईघाईने पेरणी केल्यानंतर पाऊस थांबला, तर बियाण्यांची उगवण कमी होण्याबरोबरच रोपे सुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दुबार पेरणी करावी लागल्यास बियाणे, मशागत, मजुरी आणि खतांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडणार आहे.
तालुका प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, खर्डा मंडळात सर्वाधिक 216.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, अरणगाव मंडळात 125.7 मिमी पाऊस झाला आहे. मात्र तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पावसाचे असमान वितरण स्पष्टपणे दिसून येत आहे.कृषी तज्ज्ञांच्या मते, सलग आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पिकांसाठी सर्वाधिक पोषक असतो. मात्र अल्पावधीत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ खंड पडल्यास जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो. त्यामुळे बियाण्यांची उगवण, मुळांची वाढ आणि पिकांची प्रारंभिक वाढ प्रभावित होते. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच टप्प्याटप्प्याने पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.यंदा सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि कापूस या पिकांच्या पेरणीवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास खरीप हंगामातील उत्पादनावरही त्याचे परिणाम दिसून येऊ शकतात, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
जामखेड तालुक्यात केवळ 10 टक्के खरीप पेरण्या
यंदाच्या खरीप हंगामात जामखेड तालुक्यात एकूण 58 हजार 842 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे अद्याप केवळ सुमारे 10 टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाचा सलग खंड पडत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय पुढे ढकलला आहे.
खरीप हंगामाचे प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)
* उडीद : 25 हजार हेक्टर * सोयाबीन : 22 हजार हेक्टर * तूर : 8,700 हेक्टर * मूग : 1,200 हेक्टर * मका : 1,040 हेक्टर * बाजरी : 200 हेक्टर * कापूस : 125 हेक्टर
शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये
सध्या पावसाचे वितरण असमान असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये. किमान 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे. पेरणीनंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्यास उगवण व पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसारच पेरणीचे नियोजन करावे.
– रविंद्र घुले,
तालुका कृषी अधिकारी, जामखेड
कोणत्या पिकांवर सर्वाधिक परिणाम?
* सोयाबीन : उगवण आणि प्रारंभिक वाढ धोक्यात.
* कापूस : दीर्घ खंडामुळे वाढ खुंटण्याची शक्यता.
* मूग-उडीद : सुरुवातीच्या पावसावर अवलंबून असल्याने अधिक धोका.
* मका : सातत्याने ओलावा आवश्यक; अन्यथा वाढ मंदावते.
* तूर : तुलनेने कमी परिणाम; मात्र दीर्घ खंड पडल्यास उत्पादनावर परिणाम.
29 जूनपर्यंत जामखेड तालुक्यात
मंडलनिहाय पडलेला पाऊस (मिमी)
मंडल ः पाऊस (मिमी) ः * जामखेड ः 78.7 * अरणगाव ः 125.7 * खर्डा ः 216.7 * नान्नज ः 113.8 * नायगाव ः 102.0 * पाटोदा ः 23.3 * साकतः 88.3










