भोंगळ कारभार चव्हाट्यावर, जामखेडकर संतप्त!
जामखेड | नगर सह्याद्री
पहिल्याच दमदार पावसानंतर जामखेड नगरपरिषद प्रशासनाच्या पावसाळी पूर्वतयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे नगरपरिषदेच्या नियोजनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील रस्ते, गटारी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी दरवष लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, ज्या ठिकाणाहून संपूर्ण शहराचा कारभार चालतो, त्या नगरपरिषद कार्यालयाच्या दारातच पाणी साचल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हायरल झालेल्या छायाचित्रात कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अक्षरशः तळे साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांसह कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
या फोटोवर सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जिथून शहराचा विकास आणि स्वच्छतेचे नियोजन केले जाते, तिथेच अशी परिस्थिती असेल तर शहरातील इतर भागांची अवस्था काय असेल? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. काहींनी नगरपरिषदेच्या पावसाळी पूर्वतयारीवर टीका करत तातडीने जलनिस्सारण व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे.दरम्यान, शहरातील अनेक भागांतही पावसाचे पाणी साचणे, गटारी तुंबणे आणि रस्त्यांवर चिखल होणे अशा समस्या नागरिकांना भेडसावत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्षात प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘कार्यालयासमोरच पाणी; मग शहराची काय अवस्था?’
नगरपरिषद कार्यालयाच्या दारातच पावसाचे पाणी साचल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. स्वतःच्या कार्यालयासमोरील पाण्याचा निचरा होत नसेल, तर शहरातील इतर भागातील नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहत असेल? असा संतप्त सवाल जामखेडकरांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने या समस्येवर उपाययोजना करून भविष्यात अशी वेळ येणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.










