श्रीगोंदा | नगर सह्याद्री
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी-शतमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.
शेतकरी नेते राजेंद्र (आबा) म्हस्के यांच्या पुढाकाराने शहरातील ए स्टार हॉटेल येथे आयोजित बैठकीला विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अनिल घनवट, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, अनिल ठवाळ, मारुती भापकर, श्रीनिवास नाईक, हेमंत नलगे, राजेंद्र नागवडे, मुकुंद सोनटक्के, शामराव नागवडे, माऊली मोटे, भास्कर वागस्कर, नितीन डुबल, भाऊसाहेब नेटके, अशोक नवले, रघुनाथ सूर्यवंशी, वसंत जामदार, राजेंद्र इधाते, महादेव म्हस्के, अनिल भुजबळ, दिलीप कर्डिले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सरसकट कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे मत उपस्थितांनी नोंदवले. सरकारच्या धोरणांविरोधात तालुकाभर जनजागृती करत लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
त्याअनुषंगाने दि. 19 जून रोजी कोळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, दि. 22 जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन छेडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्वपक्षीय एकजूट कायम ठेवून निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.










