खरवंडी परिसरातून ताब्यात; आणखी दोन आरोपींचा शोध सुरू
पाथर्डी | नगर सह्याद्री
पाच दिवसांपूव चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर पिस्तूलातून गोळीबार करून फरार झालेल्या तिघा आरोपींना पाथर्डी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे. या कारवाईत आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
अक्कलकोट पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पावलस ऊर्फ मेहेर कचरू गायकवाड, त्याचे साथीदार यांचा शोध सुरू असताना ते पाथड तालुक्यातील खरवंडी परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाथड पोलिसांनी विशेष पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली.
गुप्त माहितीच्या आधारे खरवंडी परिसरात सापळा रचून संशयितांचा पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी संबंधित चोरीच्या गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलिस कोठडीही मिळविण्यात आली आहे.
या कारवाईत सुदाम वामन राठोड (वय 25 रा.दुर्गानगर तांडा), कृष्णा बाळू पवळे (वय 24) आणि इब्राहिम महंमद सय्यद (वय 29, दोघे रा. खरवंडी, ता. पाथड) यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पाथड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल लहाने, संदीप ढाकणे यांच्यासह पाथर्डी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.










