दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश
गावठी पिस्तूल व घातक हत्यारांसह चौघे गजाआड, एक फरार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घातक हत्यारांसह एकत्र आलेल्या चार सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस, कोयता, चाकू आणि मिरची पूड असा एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुऱ्हाणनगर रोडवरील मिरावली पहाडाच्या पायथ्याशी काही तरुण संशयास्पद रित्या थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने वारूळवाडी परिसरात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी मुस्ताक इब्राहिम शेख (वय 22), विराट ऊर्फ विल्यम रवींद्र मेहंदळे (वय 26), समर्थ बाबासाहेब मांडळकर (वय 19) आणि समर्थ राजेंद्र दुधभाते (वय 18, सर्व रा. कोंढवा, पुणे) या चौघांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथीदार आकाश संजय पवार (रा. भिंगार, अहिल्यानगर) हा पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता, विराट मेहंदळे याच्याकडे 40 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस सापडले.
मुस्ताक शेख याच्याकडे धारदार कोयता, समर्थ दुधभाते याच्याकडे स्टीलचा बटनचा चाकू आणि समर्थ मांडळकर याच्याकडे लाल मिरचीची पूड मिळून आली. तसेच त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे चार महागडे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी घातक हत्यारांसह कोठेतरी मोठा दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असल्याचे तपासात समोर आले आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुनील विनायक पवार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सहाय्यक निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गारुडकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
अहिल्यानगरमध्ये पुमा कंपनीचे बनावट कपडे विकणारे गजाआड
दोन लाख 34 हजारांचा माल जप्त
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
प्रसिद्ध नामांकित कंपनीचा बनावट लोगो वापरून कपड्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 2 लाख 34 हजार 450 रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
याप्रकण महेंद्र सोहन सिंग (वय 36, रा. राजस्थान) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शाहरुख इस्माईल शेख (वय 24, रा. बाराबाभळी, अहिल्यानगर), अरबाज राजू बागवान (वय 23, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) आणि सौरभ रमेश सुडके (वय 24, रा. सुडके मळा, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी शाहरुख शेख हा फरार झाला असून अरबाज बागवान आणि सौरभ सुडके या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बालीकाश्रम रस्ता परिसरातील मशिव स्पोर्ट्स अँड शुज मॉल आणि आर. जी. स्पोर्ट्स अँड शुज मॉल या दोन दुकानांमध्ये ही कारवाई करण्यात आली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नामांकित कंपनीचे बनावट टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, जॅकेट आणि मोजे यांवर हुबेहूब लोगो लावून त्यांची विक्री करत होते. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर बनावट कपडे आणि छापील टॅग हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी आणि पोलीस हवालदार आंधळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
भररस्त्यात मजुराला कोयत्याने मारहाण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील लालटाकी परिसरातील अनिता वाईट शॉपसमोर काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. येथे किरकोळ कारणावरून चार अनोळखी व्यक्तींनी एका मजुराला बेदम मारहाण केली. या घटनेत रोहित बबन शिंदे (वय 27 वर्षे, राहणार वारुळाचा मारुती, नालेगाव, अहिल्यानगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शिंदे हा मजूर म्हणून काम करतो. दि. 25 मे 2026 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास तो अनिता वाईट शॉपच्या समोरून जात असताना अचानक चार अनोळखी व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी रोहितला कोणत्याही कारणाशिवाय विनाकारण वाईट वाईट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रोहितने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्या चारही जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या चार अनोळखी व्यक्तींपैकी एकाने आपल्या हातातील कोयत्यासारख्या लोखंडी हत्याराने रोहितवर थेट हल्ला केला. हा वार रोहितच्या उजव्या खांद्यावर लागल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी रोहितला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरुणावर हल्ला
अहिल्यानगर : भिंगार परिसरातील नगर-पाथड रस्त्यावरील प्रकाश उपहारगृहासमोर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर जुन्या कारणावरून चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
या मारहाणीत गणेश सुरेश आळकुटे (राहणार- भिंगार, अहिल्यानगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी गणेश आळकुटे हा काल रात्री रस्त्यावरून जात असताना आरोपी योगेश कांबळे, अभि वाघेला, सनी निकाळजे आणि तारा पाटोळे यांनी त्याला विनाकारण अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी कोयत्याने मारहाण केली. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे.
केडगावमध्ये राडा
अहिल्यानगर: केडगाव परिसरामध्ये एका 24 वषय तरुणावर जुन्या वादातून लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रदिप नारायण चव्हाण (वय 23, रा. मोहिनी नगर, केडगाव) हे सफाई कामगार म्हणून काम करतात. 25 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते केडगावदेवी ते केडगाव वेस दरम्यान असलेल्या ओढ्याच्या पुलावर थांबलेले होते. त्या वेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्यांना गाठले. पूर्ववैमनस्यातून आरोपी सूर्या जाटला काळे याने फिर्यादी प्रदिप यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. हा वार प्रदिप यांच्या डोक्याला डाव्या बाजूला कानाच्या वर लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच कुणाल सूर्या काळे याने प्रदिप यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली आणि ठार मारण्याची धमकी दिली.










