गांधी मैदानात दुधाची आवक घटली | म्हशीचे दूध 100 रुपये लीटर | दुग्धजन्य पदार्थांच्या किमती भडकल्या!
सुनील चोभे | नगर सह्याद्री
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात उघडलेल्या मोहीमेचा मोठा परिणाम अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या बाजारात दिसू लागला आहे. भेसळखोरांवर कठोर कारवाई सुरू झाल्याने शहरात खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाला असून त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे शुद्ध दुधाची मागणी वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळू लागला आहे.
अहिल्यानगरच्या गांधी मैदान येथे दररोज भरत असलेल्या दूध बाजारात गेल्या काही आठवड्यांपासून दुधाची आवक लक्षणीय घटली आहे. यापूव म्हशीच्या दुधाला 80 रुपये प्रतिलिटरपर्यंत भाव मिळत होता. मात्र भेसळखोरांवर कारवाईनंतर दुधाचा पुरवठा कमी झाल्याने आता म्हशीच्या दुधाला तब्बल 100 रुपये प्रतिलिटर भाव मिळत आहे. गायीच्या दुधालाही 50 ते 60 रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. भेसळविरोधी मोहिमेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काही शेतकरी संघटनांनी दिला आहे. भेसळखोरांवर पहिल्यांदाच इतक्या कठोर पद्धतीने कारवाई होत आहे. ही मोहीम थांबू नये, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे.

दूध डेअऱ्यांमधून खवा-पनीर गायब
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईनंतर शहरातील अनेक दूध डेअऱ्यांमध्ये खवा आणि पनीर मिळणे कठीण झाले आहे. भेसळ रोखण्यासाठी गावोगावी धाडी टाकल्या जात असून दूध डेअऱ्या, मिठाई उत्पादक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी केली जात आहे. शिडतील पेढा उत्पादकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या खवा आणि पनीरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. हॉटेल व्यवसायालाही याचा फटका बसत असून अनेक हॉटेल चालकांना पनीर मिळविण्यासाठी जादा दर मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी तर पनीरची उपलब्धताच नसल्याची स्थिती आहे.
भेसळखोरांना धडा, पण शेतकऱ्यांनाही न्याय हवा ः नंदू रोकडे
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांना शुद्ध दूध मिळत आहे, ही चांगली बाब आहे. मात्र दूध उत्पादक टिकवायचे असतील तर गायीच्या दुधाला किमान 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 80 रुपये दर कायम मिळायला हवा. भेसळखोरांवर कठोर कारवाई सुरूच राहिली पाहिजे असे खडकी येथील दूध उत्पादक नंदू रोकडे यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.
खवा 350, पनीर 480; तुपाने गाठली 900 रुपयांची पातळी
दुग्धजन्य पदार्थांच्या दरवाढीने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. काही महिन्यांपूव 200 रुपये किलो मिळणारा खवा आता 350 रुपयांवर पोहोचला आहे. पनीरचा दर 400 रुपयांवरून 480 रुपये किलो झाला आहे. तूप 700 रुपयांवरून थेट 900 रुपये किलोपर्यंत गेले असून दह्याचाही दर 100 रुपयांवरून 120 रुपये किलो झाला आहे.
पाथर्डी -बीड-आष्टी-धाराशिवहून येणारा खवा बंद
अहिल्यानगर शहरात मोठ्या प्रमाणात पाथर्डी, बीड, आष्टी आणि धाराशिव भागातून खवा पुरवठा होत होता. मात्र भेसळखोरांवर कठोर कारवाईचे धोरण अवलंबल्यानंतर या भागांतून येणारा खव्याचा पुरवठाच जवळपास बंद झाला आहे. परिणामी बाजारात खव्याचा तुटवडा निर्माण झाला असून दर 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत.
जनावरांच्या किमती गगनाला
दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या जनावरांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. यापूव 50 ते 60 हजार रुपयांत मिळणाऱ्या गायी आता 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत. एक ते सव्वा लाख रुपयांत मिळणारी म्हैस आता दीड लाख रुपयांवर पोहोचली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दर वाढण्याची परंपरा असली तरी यंदाची वाढ अभूतपूर्व असल्याचे पशुपालक सांगत आहेत.
पशुखाद्य महागल्याने उत्पादन खर्च वाढला
डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम पशुखाद्यावर झाला आहे. वाळलेल्या चाऱ्याचा दर 11 रुपये किलो, मुरघास 7 ते 8 रुपये किलो झाला आहे. भुसा 1350 रुपये (50 किलो), सर्की पेंड 2250 रुपये (50 किलो) आणि गोळी पेंड 1850 रुपये (50 किलो) दराने विकली जात आहे. अवघ्या आठ दिवसांत पशुखाद्याच्या किमतीत 100 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. जनावरांच्या औषधांच्याही किमती वाढल्या आहेत.










