अक्षय कर्डिले यांनी शक्तीप्रदर्शन करत दाखल केला अर्ज | राष्ट्रवादीकडून मोकाटे यांचा अर्ज
राहुरी | नगर सह्याद्री
स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने पोटनिवडणुक होत असलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय उलथापालथ झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्यात यश आले. तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन दोघांनीही बंददाराआड चर्चा केली. रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिली. यानंतर माध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. तनपुरे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी अक्षय कर्डिले यांच्या विरोधात अन्य उमेदवारांचे अर्ज आलेले असल्याने बिनविरोध निवडणुक होण्याची सध्या तरी शक्यता कमी आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला.
शरद पवार यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गेल्या महिना- दोन महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढला होता. अत्यंत जवळच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत त्यांनी बैठकाही घेतल्या. पक्षाची उमेदवारी करण्यापेक्षा अपक्ष उमेदवारी करण्याच्या निर्णयाप्रत ते आले होते.
उमेदवारी अर्ज देखील त्यांनी पूर्णपणे भरुन तयार ठेवला होता. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी आज राहुरी गाठली. तनपुरे यांच्या घरी जाऊन दोघांनीही बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघातील काही प्रलंबीत विषय आणि मुद्दे घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झालेल्या तनपुरे यांनी हे प्रश्न आणि मुद्दे दोघांच्यासमोर मांडले. दोघांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली हे प्रश्न निकाली काढण्याबाबत प्रतिसाद दिला. त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तनपुरे यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तनपुरे यांच्या मुद्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासीत केले.
बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांनी एकत्रीतपणे माध्यमांशी संवाद साधला.
पोटनिवडणूक बिनविरोधची परंपरा ः प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
महाराष्ट्रातील एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे हे गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. तनपुरे यांनी विकासात्मक समस्या मांडल्या आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न करु असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
तनपुरे यांनी मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवू ः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
स्वगीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर होणारी पोट निवडणूक आहे. याचा सहानूभुतीपूर्वक विचार करावा. तालुक्याच्या दृष्टीने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विकासात्मक प्रश्न मांडले आहेत. केके रेंज, मुळा डॅम गाळ काढणे आणि एमआयडीसीचा प्रश्न आहे. केके रेंजमध्ये नवीन जमीनीचे अधिग्रहन होणार नाही यासाठी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच तालुक्याच्या दृष्टीने मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार ः अक्षय कर्डिले
राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी दुःखाचा आहे. या क्षणाला वडिल सोबत नाहीत. साहेबांची जबाबदारी माझ्यावर आली आहे. भाजपच्या वरिष्ठांनी विश्वास दाखवून उमेदवारी दिलीय. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेकांना जनतेचा पाठिंबा असतांनाही ज्यांनी ज्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांचा मी आभार आहे. तुमचा मी आयुष्यभर ऋणी असेल. साहेबांनंतर जनतेने मला सांभाळलेय. विश्वास टाकलाय. जनतेचे प्रेम मिळतेय. नेत्यांचे प्रेम मिळतेय. जनतेचा आशिर्वाद मिळतोय असे महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
अक्षय कर्डिले यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि पालकमंत्री विखे-पाटील यांनी तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी प्राजक्त तनपुरे यांना आगामी काळात राहुरी मतदारसंघात सांगतील त्या विकासकामांसाठी आणि समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले असून, तनपुरे यांच्या जागी पक्षाने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते गोविंदराव मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे.
मोकाटे यांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. प्राजक्त तनपुरे ऐनवेळी माघार घेऊ शकतात याची कल्पना असल्याने शरद पवारांच्या मुंबई कार्यालयातून राहुरीत प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे असे दोन एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. यात तनपुरे यांनी अर्ज दाखल न केल्याने गोविंदराव मोकाटे यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट सामना होणार आहे. येत्या २३ एप्रिलला राहुरीसाठी मतदान पार पडणार असून, ४ मे रोजी या पोटनिवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.
चव्हाण-विखे यांनी घेतली होती तनपुरेंची भेट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची त्यांच्या कार्यालयात आज (सोमवारी) सकाळी भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेची पोटनिवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
शिंदे सेनेच्या नेत्याची बंडखोरी
महायुतीमध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे येथे भाजपने उमेदवार दिला आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी बंडखोरी करत पोटनिवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.










