श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, फळबागा, सोलर यंत्रणा तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. श्रीगोंद्यात 29.4 मिलीमिटर पाऊस झाला.

अचानक आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही भागात विजेच्या खांबांनाही फटका बसल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला. शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके, फळबागा तसेच सोलर पंप आणि इतर कृषी यंत्रणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधिच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये श्रीगोंदा 104, आढळगाव 84.3, भानगाव 70.2, पेडगाव 61.5, काष्टी 57.6, मांडवगण 56.1, कोळगाव 53.5, बेलवंडी 22.3, चिंबळा 21.8, लोणी व्यंकनाथ 16.3 आणि दिवदैठण 11.8 टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी जंजीरे यांनी दिली.या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून बाधित शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कर्जतला पावसाने झोडपले
दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी श्रीगोंद्याबरोबरच कर्जतलाही पावसाने चांगलेच झोडपले. कर्जतला 38.6 मिलीमिटर पाऊस झाला. झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून आता खरीपाच्या पेरणीला वेग येणार आहे.
मान्सूनची महत्वाची अपडेट मुंबई-पुण्याच्या पावसावरही दिली अपडेट
जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून गोवानंतर तिथून पुढे महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये धडकला. मात्र अद्यापही राज्याच्या कानाकोपऱ्यात नैऋत्य मौसमी वारे पोचले नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनच्या आगमनाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अल निनो सारख्या महाभयंकर संकटामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्वमोसमी पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. मुंबईत २ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज आहे. (Mumbai Monsoon Rain Alert) मान्सूनचा प्रवास यंदा काहीसा संथ गतीने होत असला तरी तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक वर्षी मान्सूनच्या प्रवासाचा वेग कमी-अधिक प्रमाणात बदलत असतो. समुद्रातील वातावरणातील बदल, मान्सून वाऱ्यांची तीव्रता तसेच उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव यामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत असतो.
सध्या राज्यातील काही भागांत होत असलेला वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट हा पूर्वमोसमी वातावरणाचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करण्याचे टाळावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, खरीप हंगामातील पेरणीसाठी पुरेसा आणि सतत पडणारा पाऊस आवश्यक आहे. आगामी काही दिवसांत मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होण्याची शक्यता असून राज्यातील बहुतांश भागांत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.










