सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरुच
मुंबई /नगर सह्याद्री
देशातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ कायम आहे. आज सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ३०० रुपयांहून अधिक वाढ नोंदवली गेली, तर चांदीनेही मोठी झेप घेत प्रति किलो १,१०० रुपयांपेक्षा जास्त वाढ दर्शवली. १० ग्रॅम सोन्याचा दर सुमारे ₹1,52,607 वर पोहोचला होता. दिवसभरात सोन्याने ₹1,52,103 चा उच्चांक आणि ₹1,52,454 चा नीचांक गाठला. वाढत्या दरांमुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सोन्याबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे.
चांदीच्या किंमतींमध्येही आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. सकाळच्या व्यवहारात एक किलो चांदीचा दर सुमारे ₹2,59,700 वर पोहोचला. यात प्रति किलो सुमारे ₹1,160 ची वाढ झाली. दिवसभरात चांदीने ₹2,58,426 चा नीचांक आणि ₹2,61,811 चा उच्चांक गाठला.काही बाजारांमध्ये चांदीच्या दरात आणखी मोठी उसळी पाहायला मिळाली असून दर ₹2,61,500 प्रति किलोपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. याआधी याच वर्षाच्या सुरुवातीला चांदीने विक्रमी पातळी गाठत ₹4 लाख प्रति किलोचा टप्पाही पार केला होता.
जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची हालचाल आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे आगामी काळातही सोने-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार कायम राहू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी दरांची पडताळणी करणे महत्त्वाचे मानले जात आहे.










