- जाहिरात -spot_img
breaking news

नुकसानीच्या पंचनाम्यात भ्रष्टाचार; अहिल्यानगरमध्ये काय घडलं पहा

वडगाव सावताळ येथील शेतकऱ्यांची थेट महसूलमंत्र्यांकडे तक्रार; अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करणार
पारनेर | नगर सह्याद्री
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, याचे शासकीय पंचनामे करताना संबंधित अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वादळ आणि पाऊस फक्त विशिष्ट गट नंबरवरच कसा काय पडला, असा संतप्त सवाल करत वडगाव सावताळ येथील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी थेट राज्याचे महसूलमंत्री योगेश कदम यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. जोपर्यंत या प्रकरणाची शासकीय स्तरावर सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत मंजूर झालेले शासकीय मदत निधीचे वितरण कोणालाही करू नये, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संगनमत करून केवळ काही विशिष्ट आणि मजतील शेतकऱ्यांचेच पंचनामे कागदोपत्री तयार केले आहेत. प्रत्यक्षात ज्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांना या यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हे सर्व पंचनामे पूर्णपणे खोटे आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहेत.या अन्यायाबाबत आणि खोट्या पंचनाम्यांबाबत जेव्हा शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयात माहिती विचारण्यासाठी गेले, तेव्हा तेथील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत उद्धट आणि दादागिरीची भाषा वापरली. तुमचा पंचनामा होणार नाही, काय करायचं ते करा, कोण तुमचा पंचनामा करतो तेच आम्ही पाहतो, आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, अशी धमकीवजा आव्हानाची भाषा अधिकाऱ्यांनी वापरल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

प्रशासनाच्या या अशा वागणुकीमुळे सर्वसामान्य आणि गरीब शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला असून, यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा सगळा प्रकार तात्काळ थांबला पाहिजे आणि दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी वडगांव सावताळ येथील ग्रामस्थांनी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि पारनेरचे तहसीलदार यांच्यासह लोकप्रतिनिधींना सविस्तर निवेदने दिली आहेत. जर या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई झाली नाही, तर निवेदनावर सह्या करणारे सर्व शेतकरी बांधव तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  कडक उन्हाळ्यात सफरचंदाला लागले फळ.... पाथर्डी तालुक्यात अभिनव प्रयोग

हे निवेदन प्रशासनाला देताना गावातील शेतकरी ज्ञानदेव शिंदे, दत्तात्रय शिंदे, अविनाश शिंदे, भाऊ शिंदे, योगेश शिंदे, यशवंत करगळ, राजू शिंदे, राधुजी शिंदे आणि गणेश सुळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी विजय रोकडे, भाऊसाहेब रोकडे, शुभांगी साळुंके, अंकुश आंधळे, भास्कर साळुंके, बाबासाहेब शिंदे, बन्सी शिंदे, भीमाबाई आंधळे, तुकाराम साळुंके या शेतकऱ्यांसह गावातील एकूण शंभराहून अधिक बाधित शेतकऱ्यांनी या निवेदनावर आपल्या स्वाक्षऱ्या करून प्रशासनाकडे न्यायाची आर्त हाक मारली आहे.

मजतील लोकांचेच खोटे पंचनामे
अवकाळी पावसाने आमचे डोळ्यादेखत नुकसान झाले, पण अधिकाऱ्यांनी एसी गाडीतून न उतरता मजतील लोकांचेच खोटे पंचनामे केले. आम्ही हक्काची मदत मागण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलो, तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला थेट दमदाटी केली. हा आमच्या घामाचा आणि हक्काचा पैसा आहे. जोपर्यंत या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन खऱ्या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.
– भाऊ शिंदे, शेतकरी, वडगाव सावताळ

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ