- जाहिरात -spot_img
breaking news

‘अपने अपने राम’ कथेने अहिल्यानगर बनले राममय ; शहरातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यास हजारोंची उपस्थिती

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
जय श्रीराम… जय जय श्रीराम…सियावर रामचंद्र की जय… असा जयघोष आणि सीताराम से नाता जोडा है…, राम राम रटते रटते…. राम बनके चले आना…, मंगल भवन अमंगल हारी… कानडा राजा पंढरीचा… अशा अविट गोडीच्या भजनांनी अहिल्यानगर राममय झाले. निमित्त होते… स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त काका ट्रस्ट व जगताप परिवाराने आयोजित केलेल्या ‘अपने अपने राम’ या राम कथेचे. या माध्यमातून आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांनी हिंदू धर्म जागर केला. या राम कथेला तीन दिवसात तब्बल ७५ हजारावर भाविकांनी उपस्थिती लावल्याने नगर शहर राममय झालं.

हा नगर शहरातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा ठरला. अहिल्यानगर नामकरणा नंतरचा हा पहिलाच भव्य सोहळा शहराच्या नामकरणाला साजेसा ठरल्याचे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. अत्यंत सुटसुटीत व शिस्तबद्ध झालेल्या या सोहळ्यात सर्व भाविकांना सर्वप्रकारच्या उत्तम सुविधा व स्वादिष्ट भोजनाचा महाप्रसाद देण्यात आले. सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती यातून अनोखे धार्मिक शक्ती प्रदर्शन आमदार जगताप यांनी यशस्वी केल्याचे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.

२०२४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर गाडीचा गिअर बदलल्यासारखे धाडसी पाऊल उचलत शहराच्या विचाराशी निगडित, पण त्यांच्या राजकीय वाटचालीचे अवलोकन करता हिंदुत्व भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या या भूमिकेला पूरक ठरेल व स्व.अरुणकाका जगताप यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा ‘अपने अपने राम’ हा उपक्रम घेऊन राजकीय नेतृत्व व प्रगल्भता दाखवून दिली. डॉ.कुमार विश्वास हे देशातील प्रसिद्ध कवी आहेतच. राजकारणातही त्यांनी काम केले आहे. राम कथेच्या निमित्ताने स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांच्या रामकथेत रामायणातील कथा निरूपणवर भर न देता त्यातील विविध प्रसंग कसे मानवी जीवनाशी निगडित आहेत हे सोदाहरण स्पष्ट करीत अनोखी राम कथा सादर करण्यावर भर दिला. नगरच्या भाविकांना ही कथा भावल्यानेच शहरातील वातवरण राममय झाले. प्रत्येक वाक्याला डॉ.विश्वास भाविकांच्या टाळ्या घेत होते. त्यांनी आपल्या सुरेल भजनांच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

हे सुद्धा वाचा :  विवाहितेची दीड वर्षीय मुलासह आत्महत्या, नेमकं कारण काय पहा

अहिल्यानगर आता नवे धर्मक्षेत्र
रामकथेच्या आयोजनातून आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर हे आता नवे धर्मक्षेत्र होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे संकेत दिले. शहराची ही नवी ओळख त्यांच्या ‘नगर बदलतंय…’ या टॅग लाईनला पूरक दिसू लागली आहे. यामुळेच शहरातील वातावरण राममय झाले. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वर्षश्राद्धला फक्त आप्त स्वकीय यांना बोलावणे ही परंपरा आहे, परंतु स्वर्गीय अरुणकाका जगताप यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेले कार्य पाहता शहराचा कर्ता पुरुष अशी त्यांच्याविषयी भावना सामान्य नगरकरांमध्ये बऱ्याच अंशी आहे. याच भावनेला महत्त्व देताना त्यांच्या प्रथम स्मृती दिनी सर्व शहरवासीयांना बोलावून त्यांच्यासाठी रामकथेचे केलेले आयोजन खूप महत्त्वाचे ठरले.

एक लाख स्क्वेअर फुटाचा भव्य जर्मन हँगर मंडप, बसण्यासाठी हजारो खुर्च्या, पंखे, कुलर, स्वच्छतागृह, कार्यक्रम स्थळापर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी नेण्या-आणण्यासाठी ई-रिक्षा, एलईडी स्क्रीन, व्यासपीठावर अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती, त्यात प्रभू श्रीराम, जानकी, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती, तीनही दिवस मिळून आलेल्या सुमारे ७५ हजारावर भाविकांना रुचकर मिष्टान्न महाप्रसाद, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे जपलेले प्रोटोकॉल, सुरक्षिततेसाठी बाउन्सर व सीसीटीव्ही यामुळे कोणताही अनुचित प्रकार तीन दिवसात घडला नाही. पोलीस प्रशासनाचे सहकार्य. या वातावरणाला पूरक डॉ. कुमार विश्वास यांचे कथा निरूपण राम जागर व हिंदुत्व धर्म जागर करून गेले. गर्दीचा विक्रम मोडणारा उपक्रम ठरला.

पुढच्या वर्षी रामकथेचे पंधरा दिवस आयोजन : आमदार जगताप यांची घोषणा
‘अपने अपने राम’ कथेच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आजोबा बलभीमअण्णा जगताप यांनी आमच्या परिवारात अध्यात्माची धारणा रुजवली. तो विचार वडील अरुणकाका यांनी पुढे नेला. या संस्कारातून आम्ही समाजकारण करीत आहोत. जीवनात विचारधारा महत्त्वाची असते. या शहराचे नाव पूर्वी वेगळे होते. आता अहिल्यानगर झाले आहे. या बदलाचा परिणाम आता झाला आहे. अहिल्यादेवीचा धर्मविचार रुजू लागला आहे. त्यामुळेच ‘अपने अपने राम’ कथेचे आयोजन केले. यामुळे स्व.काकांच्या मनालाही नक्कीच आनंद झाला असेल. यंदा तीन दिवसांची ही कथा पुढच्या वर्षी पंधरा दिवसांची करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. या कामाचा वेग वाढत हेच काँक्रिटीकरण भविष्यात शहराजवळ एअरपोर्ट पट्टी पर्यंत जाईल असा विश्वास आहे. विकास व अध्यात्म अशा वाटचालीवर अहिल्यानगर लौकिकास्पद शहर करण्याचा मानस आहे, असेही आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा :  विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा कोणाला? बैठकांमधून नवा ट्विस्ट समोर

शहराची बदलणारी ओळख कौतुकास्पद : मंत्री राधाकृष्ण विखे
राम कथेच्या समारोपला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना मंत्री विखे यांनी विकास व धार्मिक उपक्रम यातून बदलत असलेली अहिल्यानगरची शहराची ओळख कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली. डॉ. कुमार विश्वास पूर्वी राजकीय विश्लेषक होते, परंतु त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन करून आयुष्य रामचरणी अर्पण केले. उद्याचे भविष्य अध्यात्म असल्याने त्याचा पाया तरुण पिढीत रुजवण्याचे त्यांचे प्रयत्न अभिनंदनीय आहेत. यावेळी त्यांनी स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या विषयीच्या आठवणींनाही उजाळा दिला. १९८७ मध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना काकांच्या बोटाला धरून त्यांना राजकारणात आणले. वडील स्व.बाळासाहेब विखे व स्व.काकांनी राजकारणात कायम बरोबर काम केले. अरुणकाका जेव्हा विधान परिषदेसाठी उभे राहिले तेव्हाही बाळासाहेब विखे यांनी अरुण काकांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर देत त्यांना विजयी केले. त्यांच्या कार्याचा समर्थ वारसा आमदार संग्राम जगताप यांनी जपला आहे. त्यांनी व भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अहिल्यानगर शहर फक्त स्मार्ट सिटी म्हणूनच नव्हे तर देशातील अग्रगण्य शहर म्हणून नक्कीच नावारुपाला येईल असा विश्वास ना. विखे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या प्रयत्नांना महायुती सरकार साथ देत आहे. अहिल्यानगर शहरात सेमीकंडक्टर निर्मितीचा दीड लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न आहे, चाळीस हजार लोकांना त्याच रोजगार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी काका ट्रस्टचे राजेश भंडारी, नगरसेवक विकी जगताप, अनिल मुरकुटे, अनुप काळे, अजित जगताप, गणेश गोंडाळ, शशीकांत घीगे आदींनी रामकथा सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी उत्कृष्ट नियोजन केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ