72 वाहनांवर कारवाई, 63 हजारांहून अधिक दंड वसूल
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
चारचाकी वाहनांना बेकायदेशीररीत्या काळ्या फिल्म लावून त्यांचा अवैध व्यवसाय, जनावरांची तस्करी तसेच संशयास्पद हालचालींसाठी वापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत एकूण 72 प्रकरणांमध्ये 63 हजार 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार सजावट आणि रेडियम व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी नसताना वाहनांच्या काचांवर काळी फिल्म बसवणे, नियमबाह्य नंबर प्लेट तयार करणे अथवा एचएसआरपी क्रमांक प्लेट व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या नंबर प्लेट तयार करून वाहनांवर बसवणे याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.
याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये संबंधितांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, विशेष मोहिमेदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. काळी फिल्म लावलेली वाहने 13 प्रकरणे, 11,500 रुपये दंड, विनापरवाना वाहनचालक 2 प्रकरणे, 10 हजार रुपये दंड, विनाहेल्मेट वाहनचालक 8 प्रकरणे, 8 हजार रुपये दंड, ट्रिपल सीट प्रवास 4 प्रकरणे 4 हजार रुपये दंड, जादा प्रवासी वाहतूक 1 प्रकरण, 200 रुपये दंड,मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक 1 प्रकरण1,500 रुपये दंड, विना सीट बेल्ट वाहनचालक 2 प्रकरणे 2 हजार रुपये दंड, विना नंबर वाहन1 प्रकरण 500 रुपये दंड, नो पार्किंग उल्लंघन 40 प्रकरणे 25,500 रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत एकूण 72 प्रकरणांमध्ये 63 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.ही मोहीम पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ जाधव आणि गोरख जाधव यांनी ही कारवाई केली.










