तक्रारदारास व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश
नेवासा | नगर सह्याद्री
पतीच्या अपघाती निधनाबाबत पत्नीस नुकसान भरपाई नाकारल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी, नेवासा यांना ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदार लालवंती बद्रीनाथ वाघ (रा.लोहगाव, ता. नेवासा) यांना गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत विम्याची रक्कम 2 लाख रुपये, त्यावर 6% व्याज क्लेम नाकारल्यापासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत, तसेच मानसिक त्रासापोटी 20 हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी 10 हजार रुपये देण्याचे आदेश अहिल्यानगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा अपघात कोणत्याही कारणाने झाल्यास त्याला दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. तक्रारदाराचे पती बद्रीनाथ सुखदेव वाघ दि. 14 मे 2023 रोजी मोटारसायकलवरुन प्रवास करीत असताना महिंद्रा कारने त्यांना धडक दिल्याने अपघातात ते मयत झाले होते.
तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी, नेवासा यांचेकडे गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु मयतास मोटारसायकल चालवण्याचा वैध परवाना नाही, या कारणास्तव क्लेम रद्द केला होता. सदर निकालावर नाराज होऊन त्यांची पत्नी लालवंती बद्रीनाथ वाघ यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहिल्यानगर यांचेकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज दि.5 मे रोजी मंजूर झाला.
तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याचा आदेश आयोगाचे अध्यक्ष सादिकअली बी. सय्यद तसेच सदस्या चारू विनोद डोंगरे आणि संध्या श्रीपती कसबे यांनी दिला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर सामनेवाले यांची कृती सेवेतील त्रुटी असल्याचे स्पष्ट करत, तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. या प्रकरणात तक्रारदार लालवंती वाघ यांच्यावतीने ॲड. जी. एन. घालमे व ॲड.ए.जी. घालमे यांनी काम पाहिले.










