- जाहिरात -spot_img
breaking news

नसरापूर प्रकरणात पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक खुलासा; तोंडात मोजा कोंबला, अन.. ; मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय

लैंगिक शोषणातील आरोपीला पॅरोल देऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई । नगर सह्याद्री –
पुण्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतानाच, राज्य सरकारने आता नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत ‘पॅरोल’ (रजा) देऊ नका, असे अत्यंत कडक निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीत दिले आहेत.

मंत्रालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुन्हेगारांच्या प्रवृत्तीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, “लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमधील ८० ते ९० टक्के आरोपी हे जुन्याच गुन्ह्यातून पॅरोलवर सुटलेले असतात. बाहेर आल्यानंतर ते पुन्हा त्याच प्रकारचे घृणास्पद गुन्हे करतात.” यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना असा कडक कायदा करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव न्यायालयाने तो रद्द केला होता. आता पुन्हा एकदा विधी व न्याय विभागाला तसाच कडक कायदा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून अशा गुन्हेगारांना तुरुंगाबाहेर येण्याची कोणतीही संधी मिळणार नाही.

पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वडिलांशी दोनवेळा संवाद साधला आहे. “लोकांच्या भावना तीव्र आहेत, अशा नराधमाला भरचौकात फाशी द्यावी असे सर्वांनाच वाटते. परंतु, लोकशाहीत कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कठोरतम शिक्षा कशी होईल, यासाठी आम्ही हायकोर्टाच्या माध्यमातून हे प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’वर नेत आहोत,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. वेळेत चार्जशीट दाखल करून या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लावण्याचे लेखी पत्रही शासनाने पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे.

१ मे रोजी मे महिन्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजीकडे आलेल्या अवघ्या ४ वर्षांच्या चिमुरडीचा काय दोष होता? असा सवाल आज समाज विचारत आहे. अंगणात खेळणाऱ्या या लेकीला ६५ वर्षांच्या नराधमाने गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची हत्या केली. इतकेच नव्हे, तर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून तो पसार झाला होता. या कृत्याचा त्या नराधमाला कोणताही पश्चाताप नसल्याचे पाहून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, राज्य सरकारने आता या प्रकरणाला गांभीर्याने घेत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी कायद्याची तटबंदी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

हे सुद्धा वाचा :  केडगाव दुहेरी हत्याकांड ; दगडफेकीतील आरोपींबाबत झाला मोठा निर्णय...

सरकारने विचार न करता हालहाल करत संपवावं
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, असं राज ठाकरे म्हणाले.

ही तत्परता स्त्रियांचे मुलींचे शोषण करताना सरकार दाखवत नाही
सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्टट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणते तेव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही?, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

नसरापूर प्रकरणात पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक खुलासा; अंगावर जखमा, तोंडात मोजा कोंबला, अन..
पुणे / नगर सह्याद्री –
पुण्यातील नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. चिमुरडीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टसमोर आला असून यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. नराधमामने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. तसेच चिमुरडीचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण सांगण्यात आले आहे.

चार वर्षीय मुलीचा मृत्यू हा ॲस्फिक्सियामुळे झाल्याची माहिती पोस्ट मॉर्टममध्ये देण्यात आली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी भिमराव कांबळेला अटक केली असून त्याला फाशी द्यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. आरोपीच्या पत्नीनेही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. नराधम भिमराव कांबळेला ठेचून मारलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा :  मान्सून केरळच्या उंबरठ्यावर; महाराष्ट्रात वादळी पाऊस, दोघांचा मृत्यू, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

नसरापूर प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी तीन सरकारी वकिलांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून राज्य सरकारला तीन जणांची नावे पाठवण्यात आली आहेत. दरम्यान आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया पुरावे म्हणून वापरले जाणार आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीच्या कुटुंबीयांनी दिलेली प्रतिक्रिया न्यायालयात सादर केली जाणार आहे.

पोस्ट मॉर्टममधून धक्कादायक बाब समोर उघड
आता हाती आलेल्या माहितीनुसार चिमुरडीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट हाती आला आहे. यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झाल्याचं सांगितलं गेलंय. ॲस्फिक्सियामुळे तिचा मृत्यू झाला होता. ॲस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडला जात असतो. नराधमाने चिमुरडीच्या तोंडात मोजा कोंबला होता, त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेला. यात तिचा जीव गेला. तसेच पीडित चिमुरडीच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत.

तिला गाय-वासरु आवडायचं, पण… बाप हमसाहमशी रडू लागला, आई-वडिलांनी अन्नग्रहण सोडलं
‘तिला गाय आणि वासरू खूप आवडायचे. दोन दिवसांपूर्वीच एका गायीला वासरू झाले होते. ते पाहण्यासाठीच ती गोठ्याकडे गेली’ अशा शब्दांत नसरापूर येथील अत्याचार व खूनप्रकरणातील चिमुरडीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या आठवणी सांगताना हळहळ व्यक्त केली. सोमवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली, त्या वेळी ही माहिती समोर आली.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी घडलेल्या या संतापजनक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या साडेतीन वर्षीय चिमुरडीला आरोपी भिमराव कांबळे (वय ६५) याने ‘वासरू दाखवतो’ असे सांगत गोठ्याकडे नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी पीडितेच्या घरी जाऊन आई-वडिलांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.

चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून रडताहेत
या घटनेनंतर पीडित कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन दिवसांपासून आई-वडिलांनी अन्न ग्रहण केले नसल्याची माहिती समोर आली. आई सतत चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून रडत असल्याचे पाहून पोलिस आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कुटुंबीयांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी व उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा :  विधानपरिषदच्या जागावाटपाचा तिढा सुटेना; अहिल्यानगरच घोड अडलं...

आरोपीच्या कुटुंबीयांचा संताप
“तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे” असे म्हणत आरोपीच्या मुलाने संताप व्यक्त केला. स्वतःच्या वडिलांविषयी इतका तिरस्कार आणि वेदना व्यक्त करताना तो म्हणाला, “त्या निष्पाप चिमुरडीला ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत. त्याला तात्काळ फाशी द्या.”
आरोपीची पत्नीही अश्रूंनी व्याकूळ झाली होती. “ज्या ठिकाणी त्याने हे कृत्य केलं, तिथेच त्याला ठेचून मारलं पाहिजे,” असे त्या संतप्त स्वरात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मी स्वतः आई आहे. त्या चिमुरडीच्या आई-वडिलांवर काय परिस्थिती ओढावली असेल, याची कल्पनाही करवत नाही” असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला. त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या दहा वर्षांपासून त्यांचा आरोपीशी कोणताही संबंध नव्हता.

कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार
“तो काय करायचा, कुठे फिरायचा, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण त्याच्या कृत्यामुळे आमचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुलानेही सांगितले की, “पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केले होते. त्यामुळे आम्हाला घर सोडावं लागलं. तेव्हापासून आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.” कुटुंबीयांना या गुन्ह्यासाठी दोष देऊ नये, अशी विनंतीही त्याने केली.

या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला सात मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे सध्या कसून चौकशी सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने विशेष पथक नेमून तपासाला सुरुवात केली होती. तपासाला वेग देत तिसऱ्याच दिवशी आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासाच्या पुढील टप्प्यात महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येत असून, त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपासाच्या संवेदनशीलतेमुळे माहिती अधिकृत पडताळणीनंतरच जाहीर केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ