मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलीवूडची ‘क्वीन’ तसेच भाजप खासदार कंगना रणौत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर कंगना यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. या व्हायरल फोटोमध्ये कंगना यांच्या गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या दिसत असल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लूकमुळे सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये कंगना कडक सुरक्षा व्यवस्थेत आपल्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. फिकट गुलाबी रंगाचा सलवार-सूट घातलेल्या कंगना यांनी चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव न दाखवता, पापाराझींशी (कॅमेरामन) बोलणे टाळले. त्या थेट आपल्या गाडीत जाऊन बसल्या. मात्र, कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राने आणि हातातील हिरव्या बांगड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

एका सोशल मीडिया युझरने लिहिले, “मंगळसूत्र? त्यांचे लग्न झाले का?” तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “कदाचित त्या एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करत असाव्यात.” आणखी एका चाहत्याने म्हटले, “नक्कीच त्यांना माहीत होते की कॅमेरा हे टिपणार आहे. तो भाग्यवान कोणीही असो, त्यांच्यासाठी हे चांगलंच आहे. त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी होवो. कंगना यांनी खरोखरच गुपचूप लग्न उरकले आहे की हा त्यांच्या आगामी चित्रपटातील एखादा लूक आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कंगना रणौत यांनी मुंबईत ‘क्वीन २’ च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. हा चित्रपट सध्या ‘क्वीन फॉरएव्हर’ या तात्पुरत्या शीर्षकाखाली बनवला जात असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे कंगना यांचा हा वधूच्या वेशातील लूक त्यांच्या वास्तविक आयुष्यातील नसून, चित्रपटातील पात्राचाच एक भाग असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटले आहे. लग्नाच्या या व्हायरल फोटोंवर आणि अफवांवर अजूनही कंगना रणौत किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. मात्र, या लूकने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.










