अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने सोमवारी याबाबत आदेश जारी केले. एकूण 58 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या आणि नव्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश असून, पोलीस नियंत्रण कक्षातील अनेक अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना मुदतवाढही देण्यात आली आहे. महत्त्वाच्या बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि विजय देशमुख यांची जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. तर संतोष भंडारे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांची राहुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, तोफखाना, कोतवाली, शेवगाव, कर्जत, पाथड, संगमनेर शहर, श्रीरामपूर शहर, शिड, एमआयडीसी, राहुरी, जामखेड, पारनेर, नेवासा, सुपा, अकोले, सोनई आदी पोलीस ठाण्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.










