राहुरी | नगर सह्याद्री
मागील भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि. 14 जून रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर घडली. भर दिवसा प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावर बाजार समितीसमोर दि. 25 एप्रिल रोजी दोन गटांत तुफान मारहाण झाली होती. त्यावेळी परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्याच भांडणाच्या कारणावरून दि. 14 जून रोजी एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. योगेश ऊर्फ डॉन चोपडे (रा. राहुरी खुर्द) हा तरुण दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान त्याच्या मोटरसायकलवर राहुरीकडून राहुरी खुर्दकडे जात होता. त्यावेळी जुने बसस्थानक परिसरात पाठीमागून एका मोटरसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी योगेश ऊर्फ डॉन याला अडविले. अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. बारागांव नांदुर) याने योगेश याच्यावर अचानकपणे धारदार चॉपरने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश याच्यावर तीन ते चार वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
योगेश याने प्रतिकार केल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, आरोपी तत्काळ घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील तरुणांनी गंभीर जखमी झालेल्या योगेश ऊर्फ डॉन याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी रुग्णालय परिसरात मोठी गद झाली होती. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन आरोपींचा शोध सुरू केला.
घटनेनंतर योगेश याचे मित्र व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. योगेश चोपडे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, भर दिवसा तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












