- जाहिरात -spot_img
breaking news

आजोबांवर गोळीबार करून पळालेला नातू जेरबंद; एमआयडीसीत कंपनीतून आठ लाखांचे चांदीचे पार्ट चोरीला, व्यावसायिकाला मारहाण…

गावठी कट्ट्यासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
राहुरी | नगर सह्याद्री –
राहुरी तालुक्यात आजोबांवर जीवघेणा गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत मुळा धरण परिसरातून ताब्यात घेतले. आरोपीकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण 2 लाख 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास मोमीन आखाडा (ता. राहुरी) येथील दगडू गंगाराम कोहकडे यांच्यावर त्यांचाच नातू प्रविण बाबासाहेब कोहकडे (वय 22) याने गोळीबार केला होता. यापूव गुन्हा दाखल केल्याच्या रागातून प्रविणने आजोबांचा जीव घेण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी बारागाव नांदूर ते मुळा धरण परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने स्वतःचे नाव प्रविण बाबासाहेब कोहकडे असल्याचे सांगितले.

झडतीदरम्यान आरोपीकडून 30 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 4 हजार रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे, मोबाईल, कट्टा ठेवण्याचे लेदर पाऊच तसेच काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या असा एकूण 2 लाख 4 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.

एमआयडीसीतील प्रथमेश कंपनीतून आठ लाखांचे चांदीचे पार्ट चोरीला
कर्मचाऱ्याला ठोकल्या बेड्या | मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील प्रथमेश इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीतून इलेक्ट्रिक स्विच निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या धातूच्या पार्टची चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून 8 लाख 39 हजार 619 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  बापासह हॉटेलचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे स्टोअर मॅनेजर प्रदीप प्रभाकर गायकवाड (वय 47, रा. भिस्तबाग चौक, सावेडी, अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजल्यापासून 22 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत कंपनीच्या स्टोअर रूममधील लोखंडी रॅकमध्ये ठेवलेले चांदीचे पार्ट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विलेषणाच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान कंपनीतच काम करणारा अभिषेक प्रभाकर शिंदे (वय 26, रा. निंबळक, ता. जि. अहिल्यानगर) यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीने चोरीचा मुद्देमाल आपल्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी माणिक चौधरी व त्यांच्या पथकाने केली.

व्यावसायिकाला मारहाण
अहिल्यानगर: शहरातील लालटाकी भागातील मिसगरचाळ येथे जागेच्या कारणावरून झालेल्या वादातून एका आकाश कंदील व्यावसायिकाला धारदार शस्त्राने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोसिन वसिम खान (वय 38, रा. मिसगरचाळ, लालटाकी, अहिल्यानगर) हे आपल्या कुटुंबासह राहून आकाश कंदील बनवण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा सलमान अब्दुल शेख याच्यासोबत जागेचा जुना वाद सुरू आहे. याच वादाच्या कारणावरून ही मारहाणीची घटना घडली. मोसिन खान हे बाजार आणण्यासाठी रस्त्याने जात असताना, रिक्षातून सलमान अब्दुल शेख हा तिथे आला. त्याच्यासोबत आधीच तिथे उभे असलेले इरफान इक्बाल शेख, हुजेब युसुफ सय्यद आणि अनिस इक्बाल शेख हे सर्वजण फिर्यादीजवळ आले. सलमान याने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मारहाण केली.

हे सुद्धा वाचा :  लोकन्यायालयात तुटलेले नाते पुन्हा जुळले; तीन वर्षांच्या चिमुकलीला मिळाले आई-वडिलांचे पुन्हा एकत्र छत्र

तरुणावर फायटरने हल्ला
अहिल्यानगर: शहरातील कापसे हॉस्पिटल परिसरात एका तरुणाला 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. वाळकी परिसरातील आरणगाव रोडवर राहणारे नदीम मुर्तुजा शेख (वय 32) हे शेळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. 28 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नदीम हे त्यांचे काम संपवून घरी परतत होते. रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जुन्या कोर्टाच्या पाठीमागील कापसे हॉस्पिटल जवळून जात असताना, त्यांच्या परिचयातील एक महिला त्यांना भेटली. नदीम हे त्या महिलेसोबत बोलत थांबले होते. त्याच वेळी अचानक तिथे तीन ते चार अनोळखी तरुण आले. त्यांनी काहीही कारण नसताना या गुंडांनी नदीम यांना शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने आणि लोखंडी फायटरने नदीम यांच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार केले.

घरासमोर उभी दुचाकी पेटवली
अहिल्यानगर: घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात इसमाने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना बोल्हेगाव भागात घडली आहे. या आगीत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, या प्रकरणी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांचे पती चालक म्हणून काम करतात. फिर्यादी यांच्याकडे दैनंदिन वापरासाठी ग्रे रंगाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली दुचाकी रात्रीच्या वेळी राहत्या घरासमोर पार्क केली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक शेजाऱ्यांनी मोठा आवाज दिल्याने फिर्यादी यांना जाग आली. त्यांनी तातडीने घराबाहेर येऊन पाहिले असता, त्यांची घरासमोर उभी असलेली दुचाकी जळत असल्याचे दिसून आले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ