अखंड नामस्मरण, भजन-कीर्तनाने परिसर दुमदुमला; हजारो भाविकांची उपस्थिती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने नवीपेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तिभाव, शिस्तबद्ध नियोजन आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आणि “श्रीराम जय राम जयजय राम” या अखंड मंत्रजपाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
पहाटे ६ वाजता जलाभिषेक, दुग्धाभिषेक व देखण्या शृंगाराने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. आकर्षक फुलांची सजावट, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि अयोध्येच्या धर्तीवर उभारलेली सजावट यामुळे मंदिर परिसर दिव्य आणि प्रसन्न भासत होता. सकाळी मंगल आरतीनंतर भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले.
सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत सामूहिक नामजप व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो भाविक एकसुरात मंत्रोच्चार करताना दिसले. मंत्रजपाच्या गजरात वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते. दुपारी बरोबर १२ वाजता प्रभु श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा पार पडताच मंदिर परिसरात टाळ्या, घंटानाद आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने जल्लोष उसळला.

भाविकांना सुरळीत व जलद दर्शन मिळावे यासाठी ट्रस्टच्या वतीने दर्शनबारी, स्वतंत्र प्रवेश-निर्गमन व्यवस्था, मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना मार्गदर्शन करत संपूर्ण व्यवस्थापन यशस्वी केले. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत होळी पौर्णिमेपासून ३१ दिवस शहरभर सामूहिक हनुमान चालीसा पठण, भजन संध्या आणि धर्मप्रसाराचे विविध कार्यक्रम घेतले जातात. यंदाही या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्येक घराघरांत श्रीरामभक्तीचा संदेश पोहोचावा या उद्देशाने कार्यक्रमादरम्यान मोफत हनुमान चालीसा पुस्तिकांचे वितरण करण्यात आले. तसेच दररोज श्रीरामचरितमानसातील चौपाई वाचन, आरती व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाचा समारोप केला जात आहे.
श्रीराम जन्मोत्सवाच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे. दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीराम लल्लाचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.
दरम्यान, आज सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रात भजन, कीर्तन व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राजज्योती नगर मित्र मंडळ व श्री देसर्डा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने बुरुडगाव रोड येथे महा हनुमान चालीसा पाठ पार पडणार आहे. रात्री ८ ते १०.३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच “श्रीराम जय राम जयजय राम” या तारक मंत्राचा संगीतमय जप हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
तसेच गुरुवार, दि. २ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सवही याच ठिकाणी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम मुथ्था व उपाध्यक्ष निखिल शेटीया यांनी दिली. त्यांनी या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्वयंसेवक, कार्यकर्ते व भाविकांचे आभार मानले.










