आमची लढाई प्रवरेच्या सभासदांच्या हक्काच्या पैशांसाठी : डॉ. सुजय विखे
राहाता | नगर सह्याद्री
आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नाहीत. कारखाना तुमचाच आहे. आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नाही. आमची लढाई प्रवरा कारखाना सभासदांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किवा डॉ.सुजय विखे पाटील यांचे नाहीत, तर प्रवरा कारखान्याच्या सभासदांचे आहेत. सभासदांनी उभ्या केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असल्याची भूमिका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली.
राहाता येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राहाता व गणेश परिसरातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊस प्रश्नावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना डॉ. विखे म्हणाले, ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा आहे. गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळविला होता. मग आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. त्यांनी विकासाची कामे करावीत. विरोधकांच्या भाषणांवर वेळ घालवण्यापेक्षा विकासाचे मुद्द्यांवर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.










