पाथर्डी | नगर सह्याद्री –
भरधाव वेगाने चाललेल्या पिकअपने मोटार सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. पुढे रस्त्यातच पिकअपही पलटी झाल्याची घटना नगर-पाथड महामार्गावरील त्रिभुवनवाडी फाट्याजवळ घडली.
नगर ते पाथर्डी महामार्गावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथडकडे भरधाव वेगात जात असलेल्या पिकअपच्या चालकाला करंजीपासून तीन किमी अंतरावरील त्रिभुवनवाडी फाट्याजवळ असलेल्या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने समोरून येत असलेल्या मोटारसायकलस्वारास जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.
खरवंडी येथील भगवान विद्यालयातील कर्मचारी नारायण उत्तम ढाकणे (वय 56, रा. सांगळवाडी ता. शिरुर कासार, जि. बीड) हे जागीच ठार झाले. ते आपल्या कामानिमित्त मोटारसायकलवरून (एम एच 23 जी-4547) पाथडरून नगरला चालले होते. नगरहून कंपाऊंड जाळी व तार घेऊन भरधाव वेगाने चाललेल्या पिकअप (एम एच 16 डीपी-1255) चालकास या महामार्गावरील त्रिभुवनवाडी फाट्यावर असलेल्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने पिकअपने मोटारसायकलला जोराची धडक दिली. पुढे जाऊन पिकअप रस्त्यावरच पलटी झाली. अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाल्याचे पाहून पिकअपचालक तेथून पसार झाला. याबाबत पाथड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेची माहिती समजताच महामार्गाचे उपनिरीक्षक वसंत जिवडे यांनी कर्मचाऱ्यांसह अपघातग्रस्तांना मदत करून वाहतूक सुरळीत केली.










