लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
मुंबई / अहिल्यानगर / श्रीगोंदा / नगर सह्याद्री –
महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. शेतकऱ्याना दुबार पेरणी करण्याची वेळ येऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कल्पना शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तर, जून महिन्याचा पहिला आठवडा संपल्यानंतरही मान्सूनच्या पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. याबाबत सातत्याने हवामान विभागाकडून माहिती देण्यात येत आहे. मात्र, आता आनंदाची बातमी असून राज्यात मान्सूनची आणखी आगेकूच पाहायला मिळत आहे. 8 जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल झाला असून हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरच राज्यात पावसाच्या (Rain) सरी कोसळणार आहेत.
मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती पाहायला मिळत असून तेलंगणाच्या काही भागांमध्ये देखील मोसमी वारे सक्रिय झाले आहेत. रत्नागिरीच्या दापोरीजवळी हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतही मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल वातावरण आहे. तर, ईशान्य भारतातील उर्वरित राज्यांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. त्यामुळे, राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
कोकणात पावसाचे आगमन
कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. रत्नागिरीमध्ये देखील पावसाचे ढग जमा झाल्याचे चित्र आज सकाळपासूनच बघायला मिळतंय. त्यामुळे शेतकरी देखील शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.
पेरणासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा करावी
दरम्यान, मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसारच आपली शेतीची काम करायला हवीत. कारण, 15 जूनपर्यंत पेरणीसाठीचा पाऊस पडणार नसल्याची माहिती सीएमओने दिली होती. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असेही सांगण्यात आलं आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे, मान्सूनच्या आगमनानंतर देखील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी प्रतीक्षा करायली हवी.
अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात 8 ते 9 जून दरम्यान तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहिल्यानगर दादासाहेब गिते यांनी केले आहे. तसेच पुढील तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना वादळ व मेघगर्जनेच्या काळात झाडाखाली थांबू नये, वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा तसेच उघड्या मैदानात, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, टॉवर किंवा धातूच्या वस्तूंजवळ उभे राहू नये, असे सांगितले आहे.
तसेच जाहिरात फलक , लोंबकळणाऱ्या केबल्स आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. धरण, नदी व कालवा परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि पाण्यात उतरणे किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शेतकरी बांधवांनी वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीट लक्षात घेऊन शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेचा इशारा मिळविण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या दामिनी मोबाईल ॲपचा वापर करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
वादळी पावसाने डाळिंब बागा भुईसपाट; हंगेवाडी व बोरी परिसराला तडाखा
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील हंगेवाडी, बोरी परिसरात रविवारी मुसळधार पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे डाळिंब पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हाताशी आलेले उत्पादन निसर्गाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनाम्यांचे काम तत्काळ सुरू केले आहे.
वादळाचा सर्वाधिक फटका हंगेवाडी आणि बोरी परिसरातील डाळिंब उत्पादकांना बसला. सहकार महष शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कोळपे यांच्यासह दत्तात्रय धायगुडे, मोहन श्रीराम धायगुडे, भरत दत्तात्रय धायगुडे, योगेश दत्तात्रय धायगुडे, विजय धायगुडे, सचिन इधाते, कुंडलिक इधाते आणि विठ्ठल रायकर या शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणी डाळिंबाची झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. काढणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या बागांमधील मोठ्या प्रमाणावरील फळे जमिनीवर कोसळल्याने फळगळ झाली आहे. झाडांवर राहिलेल्या फळांवरही एकमेकांना घास लागून डाग पडले असून त्यांची बाजारपेठेतील गुणवत्ता घसरली आहे.
डाळिंब पिकासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी, खते, मजुरी आणि मशागतीवर लाखो रुपयांचा खर्च केला होता. अनेकांनी बँका तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन बागा जोपासल्या होत्या. मात्र, अवघ्या काही मिनिटांच्या वादळाने शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या कष्टांवर पाणी फेरले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.नुकसानीची गंभीर दखल घेत तलाठी महेंद्र शिंदे व कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक गायकवाड यांनी बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रत्येक शेतात जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात येत असून नुकसानीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.शासनाने बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागवडे कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कोळपे व ग्रामस्थांनी केली आहे. शासनाने लवकरात लवकर भरपाई जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










