अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
मुळा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांच्या निविदांबाबत अधिक्षक अभियंता व त्या खालील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु असून या विरोधात शासकीय कंत्राटदार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. विकासकामांसाठी आलेल्या ई निवीदांपैकी मर्जीतील ठेकेदाराच्याच निविदा मंजूर करत इतर निविदा अपात्र ठरवण्याचा धडाकाच अधिकाऱ्यांनी लावल्याने त्यांच्या या मनमानी कारभारा विरोधात इतर कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. या कारभारात त्वरित बदल करून निविदांची पारदर्शकपणे पुनर्तपासणी न झाल्यास १५ जुलैपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कंत्राटदारांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
याबाबत बिल्डर्स असोसिएशनचे माजी सचिव उदय मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटदार दत्तात्रय दराडे व शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता ओमकार भंडारी व उपकार्यकारी अभियंता धनश्री शिंदे यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी अक्षय कराड, निलेश रोकडे, आदिनाथ घुले व नारायण वनवे आदींसह कंत्राटदार उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुळा पाटबंधारे विभागाच्या वतीने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या ई निविदांप्रमाणे पात्र शासकीय कंत्राटदार सर्व आटीशर्टींची पूर्तता करत व सर्व कागदपत्रांसह मुदतीत ई निविदा सादर करत आहेत. मात्र संबंधित अधिकारी मर्जीतील कंत्राटदारांच्याच निविदा मंजूर करून इतर निविदांची पडताळणी न करताच त्या अपात्र ठरवत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण झाली असून निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, नियमबाह्य कार्य तसेच मोठ्या आर्थिक अनियमिततेचा संशय निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे अवाच्या सव्वा दराने निविदा मंजूर झाल्याने शासनावर मोठा आर्थिक बोजा पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे कंत्राटदारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सदर निविदेमधील सर्व निविदाधारकांनी सादर केलेल्या ई निविदांची व कागदपत्रांची नि:ष्पक्ष, पारदर्शकपणे पुनर्तपासणी करावी. अन्यथा १५ जुलैला अधिक्षक अभियंता कार्यालया समोर आमरण उपोषणाला करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.










