मुंबई / नगर सह्याद्री –
हवामान विभागाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि घाट परिसरात आज पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता असल्याने, आवश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे आणि प्रवासादरम्यान काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून हवामान विभागाने आज, ४ जुलै रोजी राज्याच्या विविध भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई वेधशाळेने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यांवर पावसाचा हाहाकार पाहायला मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कोकण आणि घाट परिसरात ‘रेड अलर्ट’
हवामान विभागाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट दुसरीकडे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, गोंदिया आणि कोल्हापूर घाट भागात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. याशिवाय, मराठवाडा आणि विदर्भातील जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागात पावसासोबतच वीज पडण्याची शक्यता अधिक असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी.
मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा
राज्यभरात पावसाचा जोर कायम असताना मुंबईमध्ये देखील आज सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग पूर्णपणे भिजून निघाले असून, आजही पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाने मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या असून, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईसह आज कुठे-कुठे रेड अलर्ट?
महाराष्ट्रात 4 ते 7 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. संभाव्य परिस्थिती पाहता मुंबईतील पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस कोसळला आहे. तर मुंबई आणि ठाण्याला आज आणि उद्या रेड अलर्ट आहे. यासह, ठाणे, पुणे घाटमाथा, पालघर, सातारा, रायगड या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेल्पलाईन क्रमांक जारी
बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827,
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42
शाळा, महाविद्यालयांना तडकाफडकी सुट्ट्या जाहीर
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या अंदाजामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनेक ठिकाणी जलमय रस्ते आणि वाहतूक कोंडीचा अनुभव येत असून, पाणीसाठ्यात वाढ अपेक्षित आहे. प्रशासनाने खबरदारीचे उपाय योजले आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दिनांक 4 जुलै रोजी दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी
शनिवारी सकाळी हवामान विभागाने राज्यात सर्वदूर दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस सांगितला आहे. तसेच पुढील चार दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात चांगला पाऊस झाला असून दक्षिणेत दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे पेरणी झालेल्या खरीपांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.










