नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याबाबत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. खरात प्रकरणाचा तपास वेगाने कऱण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी दिल्या आहेत. एसआयटी, गुन्हा शाखांसोबत इतर संस्थांकडूनही खरातची कसून चौकशी केली जात आहे. खरात याला राजकीय अभय असल्याचा आरोप वारंवार होत आहे. आता एसटीआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात याच्याकडे कोणकोणत्या नेत्यांची उठबस होती. खरातच्या फार्महाऊसवर कोण कोण आले होते, याची सर्व माहिती एसआयटीला मिळाली आहे. एसटीआटीच्या तपासात काय समोर आले? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात SIT कडून वेगात तपास केला जात आहे. या प्रकऱणात असलेल्या एकालाही सोडणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर एसटीआयटीकडून खरातच्या जवळच्या आणि विश्वासू सर्व लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. खरात याच्या फार्महाऊस मॅनेजर, शिपाई आणि मंदिर पुजाऱ्याची रविवारी तब्बल ८ तास चौकशी केली. या चौकशीतून एसआयटीला अतिशय महत्त्वाची माहिती मिळाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आता कुणाची नावे समोर येणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भोंदू बाबा अशोक खरात फार्महाऊस आणि मंदिरात कधी यायचा? याची टाइमलाईनच एसआयटीकडे आलेली आहे. त्याशिवाय खरातच्या फार्महाऊसवर कोणते राजकीय नेते आणि प्रभावी व्यक्ती येत होते, याची माहितीही SIT ला शिपाई, फार्महाऊस मॅनेजर आणि मंदिराच्या पुजाऱ्याने दिली आहे. खरातला नेमकं कोण कोणते नेते भेटायला येत होते? त्यांचा या प्रकरणात समावेश होता का? याची चर्चा नाशिक आणि परिसरात सुरू झाली आहे.
कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच
कामगार आणि पुजाऱ्याचा खरातसोबत संपर्क कसा आला? यावरही एसआयटीने चौकशी केली. मंदिर स्थापनेपासून असलेल्या पुजाऱ्याने अनेक नावांचा खुलासा केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पूजाविधीसाठी येणाऱ्या व्यक्तींची यादी SIT च्या हाती लागल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. लैंगिक शोषण प्रकरणात तपासाचा फोकस वाढला असून खरातच्या नेटवर्कचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एसटीआयटीच्या तपासात कुणाचा पर्दाफाश होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
लॅपटॉप,हार्ड डिस्क आणि…
सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी करण्यात आली. विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहार, नेटवर्क आणि लैंगिक शोषण प्रकरणावर एसटीआयटीकडून तपास केला जात आहे. आज खरातला मिरगावमध्ये नेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि फार्महाऊसवर खरात याची चौकशी होणार आहे. घटनास्थळी नेऊन पुराव्यांची पडताळणी करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘ती’ एक चूक अन् अशोक खरातचा संपूर्ण कारनामा समोर
ज्याच्या एका शब्दावर नाशिकमधील मोठे अधिकारी आणि राजकीय नेते लोटांगण घालत होते, तो भोंदूबाबा अशोक खरात आता लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली अटकेत आहे.
अध्यात्म आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाने आपल्या प्रभावशाली ओळखी आणि सत्तेच्या जोरावर बराच काळ सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला, पण आता तो स्वतःच्या कृत्यांच्या जाळ्यात सापडला आहे. प्रकरण काही महिने आधीच उघड होऊ शकले असते, मात्र नाशिक पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या कथित संरक्षणामुळे याला उशीर झाल्याची चर्चा आहे. अनेक बड्या नेत्यांसोबत असलेल्या जवळच्या संबंधांमुळे खरातला अहंकार चढला होता, ज्यामुळे तो सावध झालाच नाही.
मित्र आणि पत्नीच्या सल्ल्याला धुडकावले
काही महिन्यांपूर्वी खरातच्या मोबाईलमध्ये स्वतःचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सापडले होते. हे व्हिडिओ पाहून त्याच्या जवळच्या मित्रांनी त्याला सावध केले आणि “प्रकरण वाढवू नका, देवाणघेवाण करून मिटवा” असा सल्ला दिला. इतकेच नाही, तर खरातच्या पत्नीनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मोठ्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याच्या अहंकारात खरातने सर्व सल्ले धुडकावले. “मोठे लोक माझ्या पाठीशी आहेत, मला कोणाची भीती नाही,” अशा प्रकारे त्याने पत्नीलाही सडेतोड सुनावले.
पोलिस अधिकारी की खरातचा ‘सेवक’?
नाशिक विभागातील एक बडा अधिकारी खरातचा कथित आंधळा भक्त होता. खरातच्या मुलीच्या लग्नात एखाद्या नोकराप्रमाणे राबणाऱ्या या अधिकाऱ्याने खरातचा मोबाईल आपल्या विश्वासू पोलिसांच्या ताब्यात दिला. तांत्रिक विभागाने व्हिडिओ डीकोड केले, तेव्हा त्यातील दृश्ये पाहून पोलिसच हादरले. मात्र, या अधिकाऱ्याने खरातला अटक करण्याऐवजी सामंजस्याने मार्ग काढण्याचा सल्ला दिला.
“हे बाहेर आले तर बदनामी होईल, त्यापेक्षा तक्रारदारांवरच खंडणीचा गुन्हा दाखल करू,” असा विचित्र सल्ला दिल्यानंतर खरातने खंडणी मागितली जात असल्याची तक्रार दाखल केली. ही तक्रारच प्रकरणाचा टर्निंग पॉइंट ठरली. काही महिन्यांतच खरातविरोधातच गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून आणि घरातून ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, तब्बल १५० पेक्षा जास्त महिलांचे शोषण झाल्याची चर्चा आहे. एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सुरू झालेल्या या प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) नेमण्यात आली असून, आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.










