दहा दिवसानंतर सस्पेन्स संपला..
केरळ/ वृत्तसंस्था:
मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अखेर संपला असून. काँग्रेसने गुरुवारी व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. जवळपास 10 दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सतीशन यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी चर्चेची गुऱ्हाळं सुरू होती. या स्पर्धेत के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन हे होते. अखेर सतीशन यांचे नाव समोर आले. काँग्रेसचे महासचिव दीपा दासमुंशी यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. आता केरळ राज्यात काँग्रेस पर्व सुरू झाले आहे. डावे पक्षाची सत्ता या निवडणुकीत संपुष्टात आली आहे. तामिळनाडूमधील सत्तेत काँग्रेस सहभागीआहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले होते. केरळमध्ये LDF च्या 10 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेसला 63 जागा मिळाल्या. याशिवाय CPI(M) पक्षाला 26, IUML पक्षाला 22, सीपीआय पक्षाला 8, KEC पक्षाला 7, RSP पक्षाला 3 जागा मिळाल्या. तर इतराना 11 जागा मिळाल्या. यानंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला. केरळ काँग्रेसने युडीएफसह आघाडी केलेली आहे. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून सस्पेन्स काही संपला नाही. मुख्यमंत्री पदाचे गुळपीठ सुरूच होते. जवळपास 10 दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सतीशन यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
सतीशन केरळ राज्यातील परावूर या मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांनी राज्यात काँग्रेसला बुस्टर डोस दिल्याचे मानले जाते. 1990 च्या दशकात विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. केरळच्या विद्यार्थी यूनियन आणि युथ काँग्रेसमध्ये त्यांनी मोठी भूमिका निभावली. सतीशन यांची संघटनेवर मजबूत पकड असल्याचे मानले जाते. ते एक आक्रमक नेते आहेत. त्यांच्या भाषणाची केरळममध्ये तरुणाईला भुरळ पडलेली आहे. आक्रमक संवाद फेक हे त्यांचे वैशिष्ट्ये मानले जाते. 2021-2026 या कालावधीत ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी केलेल्या सडेतोड भाषणामुळे अनेकदा पिनाराई विजयन यांच्या सरकारला त्यांनी पळो की सळो करून सोडले होते.










