भाळवणी | नगर सह्याद्री
जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन टीमकडून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील मटन, चिकन विक्री करत असलेल्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी स्वच्छतेबाबत दुकानदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या.
अहिल्यानगर येथील अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सो.ह. इंगळे यांनी व्यावसायिकांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून घेत सर्व व्यावसायिकांचे प्रबोधन केले. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी मटन-चिकन दुकानांमधील स्वच्छता, शुद्ध पाण्याचा वापर, वेस्ट मटेरियलची विल्हेवाट यासंदर्भात व्यावसायिकांचे प्रबोधन केले. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त इंगळे यांनी दुकानांची नोंदणी करून फुड लायसन्स काढून घेणे व त्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी प्रबोधन केले.
येत्या तीन दिवसांत सर्व व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्र काढून घेण्यासाठी मार्गदर्शन केले.ग्रामविकास अधिकारी वाघ यांना संबंधित व्यावसायिकांचे लायसन्स तपासणी करुन खात्री करण्याचे तसेच वडापाव, भेळ यासारख्या पदार्थांसाठी वृत्तपत्रांच्या कागदांचा वापर न करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना नोटीसा बजावण्याचे निर्देश दिले. यावेळी मटन, चिकन व्यावसायिक पस्थित होते.










