महावितरणचा निष्काळजीपणा- नागरिकांचा आरोप / दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करा- शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
वीजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने वीजेचा धक्का बसून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज (सोमवारी) दुपारी स्टेशन रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही गंभीर घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रीती गांगुर्डे असे मयत झालेल्या तीन वर्षीय मुलीचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका गितांजली काळे, नगरसेवक दत्ता गाडळकर, संकेत गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. संबंधित वीजेच्या खांबातून अनेक दिवसांपासून धूर येत असल्याच्या तक्रारी वारंवार महावितरणकडे करण्यात आल्या होत्या. परंतु महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. वेळीच या वीजेच्या खांबाची दुरूस्ती झाली असती तर ही दुर्देवी घटना घडली नसती, असे सांगत नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला. तसेच दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहरी प्रमुख संभाजी कदम, गटनेते दत्तात्रय कावरे, परेश लोखंडे, काका शेळके, नितीन भुतारे आदी उपस्थित होते.










