मुंबई / नगर सह्याद्री –
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सोमवारीच त्यांनी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अवघ्या तीन दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर धडक कारवाया करत ३३ आरोपींना अटक केली असून २७ आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.
२५ ते २८ मेदरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहिमेत भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत कारवाया करण्यात आल्या.
कोणावर मोठी कारवाई
राज्यातील ५३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ ठिकाणी नियमभंग आढळून आला. याप्रकरणी २५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पाच वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे २०.५७ लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई झाली. येथे १९ आस्थापना सील करण्यात आली असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे.
दूध, आंबे, आईस्क्रीमपासून नूडल्सपर्यंत तपासणी
या मोहिमेत केवळ गुटखाच नव्हे, तर पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, फरसाण, आईस्क्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांची तपासणी करण्यात आली. संशयित २८.७८ लाख रुपयांचा साठा जप्त करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
कुठे काय आढळलं?
जळगावमध्ये गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पुण्यात इथिलीन रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करण्यात आले. धुळे जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात मटर बेसन उत्पादन सुरू असल्याचे आढळले. धारावीत लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून नूडल्स उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले. नाशिकमध्ये बनावट लेबलिंग आणि परवान्याशिवाय उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तर पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या आईस्क्रीम उत्पादन केंद्रावर छापा टाकून लाखोंचा साठा जप्त करण्यात आला.
‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही’
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. दरम्यान, तक्रारी तत्काळ नोंदवता याव्यात यासाठी लवकरच नवीन मोबाईल अॅप आणि टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.










