अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप आणि परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यवसायिकाची तब्बल 84 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जामखेड येथील कृषी सेवा केंद्र चालक उदय गुलाबराव शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी शिंदे यांना सौरभ अग्रवाल आणि शिंदे इंजिनिअर नावाच्या अज्ञात व्यक्तींनी मोबाईल फोनद्वारे संपर्क साधला होता. आरोपींनी त्यांना पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कारणांसाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली वेळोवेळी बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. हा सर्व प्रकार 31 ऑक्टोबर 2025 ते 8 जुलै 2026 या कालावधीत घडला. वारंवार पैसे देऊनही परवाना न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी सौरभ अग्रवाल, शिंदे इंजिनिअर आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
जास्त नफा मिळवून देण्याच्या आमिषाने
58 लाख 80 हजारांची फसवणूक
कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणासह इतरांची तब्बल 58 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी अंबादास यनगंदुल (वय 24, रा. नालेगाव, अहिल्यानगर, मूळ रा. करमाळा, सोलापूर) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी मन अजयकुमार कांकरीया आणि अभिनंदन अजयकुमार कांकरीया (दोघे रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हा संपूर्ण प्रकार 9 ऑगस्ट 2025 ते 25 मार्च 2026 या कालावधीत अहिल्यानगरमधील कायनेटीक चौक परिसरात घडला. आरोपींनी फिर्यादी बालाजी आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांचा विश्वास संपादन केला. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास भरघोस परतावा देतो, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण 58 लाख 80 हजार रुपये उकळले. गुंतवणूक केल्यानंतर काही काळाने फिर्यादी यांनी आपल्या रकमेची आणि नफ्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी त्यांना टाळाटाळ करणारी उत्तरे देण्यास सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही आरोपींनी पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात अर्ज केला होता. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












