- जाहिरात -spot_img
breaking news

सुजित झावरे विधान परिषद निवडणुकीसाठी थेट मैदानात… कोणाला दिले आव्हान

उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी, महायुतीमध्ये रस्सीखेच
पारनेर | नगर सह्याद्री

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेचे नेते सुजित झावरे पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष झावरे पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या पारनेरसह जिल्ह्यातील दांडग्या जनसंपर्कामुळे त्यांनी या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी (फिल्डिंग) सुरू केली आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक सदस्य विधान परिषदेवर पाठवायचा असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. या जागेवर महायुतीमध्येच मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील दोन टर्म ही जागा एकत्रित राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार अरूणकाका जगताप यांनी जिंकली होती. त्यांच्या विरोधात एकत्रित शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती. मात्र, मधल्या काळात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आता भाजपसोबत महायुतीत सत्तेत आहे. त्यामुळे जागावाटपात नगरची ही जागा नेमकी कोणाच्या पदरात पडणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा ठोकल्यास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील हे उमेदवारीसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. झावरे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. अहिल्यानगरच्या स्थानिक राजकारणात झावरे पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आणि मोठा गोतावळा आहे. हीच जमेची बाजू लक्षात घेऊन त्यांनी आतापासूनच विधानपरिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत इच्छुक आहेत. याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचेही नाव उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राहुरीच्या पोटनिवडणुकीच्या वेळी भाजप नेत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमदार अक्षय कर्डिले यांच्यासाठी माघार घेतली होती. तनपुरे यांनी अद्याप अधिकृतरित्या पक्ष सोडलेला नसला, तरी कोपरगावच्या आमदार विवेक कोल्हे यांच्याप्रमाणेच भाजप तनपुरे यांचे राजकीय पुनर्वसन करेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना लागून आहे.

हे सुद्धा वाचा :  चप्पलवरून पोलिसांनी लावला छडा

या संपूर्ण मतदारसंघात सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या जागेवर विजयाचे नेमके गणित काय असेल, हे पूर्णपणे भाजपच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. भाजपमधूनही या जागेसाठी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. जर भाजपने ही जागा स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला, तर उमेदवार निश्चितीमध्ये पािलकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महायुतीतील या अंतर्गत स्पर्धेमुळे अहिल्यानगरची ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंजक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

विधानसभेला घेतली माघार
पारनेरमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान सुजित झावरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते यांना निवडून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. झावरे यांनी सुद्धा आमदार दाते यांना विधानसभेचा उमेदवारी मिळवून देत स्वतः उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला होता. हा सर्व निर्णय त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार व मंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांच्या सांगण्यावरूनच घेतला होता. त्यामुळे आता सुजित झावरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन जिल्ह्यातील मोठे नेते न्याय देणार का हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ