डॉक्टर बेकारसे याच्यावर दिखाऊपणाच्या कारवाईने संताप
पारनेर | नगर सह्याद्री
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी व अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील सर्व पुरोगामी आणि आंबेडकरी चळवळीतील पक्ष व संघटनांच्या वतीने सोमवार, 8 जून रोजी सकाळी 11 वाजता पारनेर पोलीस स्टेशनवर ‘जन आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे.
सध्या देशात व महाराष्ट्रात मनुवादी प्रवृत्तींकडून जाणीवपूर्वक बहुजन महापुरुषांची बदनामी घडवून आणली जात आहे. खोटा इतिहास पसरवून बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकवणे, समाजात फूट पाडणे आणि देशाची अखंडता नष्ट करण्याचा हा डाव आहे. डॉ.मंगेश बेकारसे याने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत चुकीचे व बदनामीकारक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवृत्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी उदासीनता दाखवत बेकारसेवर वरवरची कारवाई करून त्याची सुटका केली. पोलिसांची ही भूमिका अत्यंत गंभीर असून अशा समाजविघातक प्रवृत्तींना खतपाणी घालणारी आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या अन्यायाविरुद्ध आणि पोलिसांच्या निषेधार्थ सोमवारच्या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जनआक्रोश मोर्चाची सुरुवात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पारनेर’ येथून होईल आणि मुख्य पेठेतून पुढे हा मोर्चा पारनेर पोलीस स्टेशनवर धडकेल. प्रशासनाने या मागण्यांची वेळीच दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर हे जनआंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे, राजेंद्र उबाळे, अमित जाधव, विशाल पटेकर, संभाजी पटेकर, भागाशेठ सोनवणे, संकेत पटेकर, किरण सोनवणे, प्रदीप नगरे, गौतम पटेकर, संतोष अडसूळ, प्रदीप कसबे, संजीवन सोनवणे, ईश्वर सोनवणे, निलेश पटेकर, अतुल भालेराव, निखिल गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.










