- जाहिरात -spot_img
breaking news

केडगावात राडा, बाप-लेकावर हल्ला, मंदिर विश्वस्तावर जीवघेणा हल्ला, भाडेकरूंना धमकावले, कुठे काय घडलं पहा…

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
बोल्हेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराचे विश्वस्त प्रकाश ज्ञानदेव सप्रे यांच्यावर काही तरुणांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरुणाला हटकल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश सप्रे हे रात्री १० च्या सुमारास मंदिरात गेले असता, त्यांना त्या ठिकाणी ओम आप्पा कनगरे हा तरुण एका मुलीसोबत बसलेला दिसला. सप्रे यांनी त्याला एवढ्या रात्री येथे काय करतो, असे विचारले. याचा राग मनात धरून ओम याने फोन करून आपल्या साथीदारांना बोलावून घेतले.

​अनुष आप्पा कनगरे, लकी कदम, ज्ञानू आमले, आदेश गायकवाड, आदित्य कवडे, सोनू कोलते आणि इतर ३-४ जण गेटवरून आत आले. त्यांनी सप्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी ओम कनगरे याने सप्रे यांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला, मात्र सप्रे यांनी हात मध्ये घातल्याने त्यांच्या मनगटाला गंभीर इजा झाली.

​मंदिराचे रक्षक आणि नातेवाईक मदतीला धावून आल्याने सप्रे यांचा जीव वाचला. गोंधळ पाहून हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी ओम आणि अनुष कनगरे या दोघांना जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी सप्रे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी आणि पोलीस हवालदार योगेश चव्हाण करत आहेत.

दुकान रिकामे करण्यासाठी भाडेकरूंना धमकावले; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : शहरातील सावेडी नाका परिसरातील इंडियन बँकेजवळ असलेल्या भाड्याच्या दुकानाच्या वादातून एका व्यक्तीसह त्याच्या भाडेकरूंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका ओळखीच्या व्यक्तीसह इतर तीन अनोळखी इसमांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर शनिवारी हायस्पीड ट्रायल; सारोळा ते विसापूर दरम्यान ताशी 130 किमी वेगाने चाचणी

​याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सय्यद इरफान अजिमोद्दीन जहागीरदार (वय ५२, रा. बाराइमाम कोठला) हे घरी असताना त्यांना मोबाईल फोनवर संपर्क करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच आरोपी आकाश सोनवणे याने इतर तीन साथीदारांसह फिर्यादीच्या सावेडी नाका येथील मालकीच्या दुकानात जाऊन तेथील भाडेकरूंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ‘हे दुकान तातडीने रिकामे करा, अन्यथा जीवे मारू’ अशी धमकी आरोपींनी भाडेकरूंना दिली. या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी आकाश सोनवणे व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५२ आणि ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम श्रीवास्तव करत आहेत. अहिल्यानगर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारे धमकावणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

केडगावात राजकीय गाण्यावरून राडा; लाकडी दांडक्याने तरुणाला मारहाण
​अहिल्यानगर : शहरातील केडगाव उपनगरात राजकीय गाणे लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन एका तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव धोंडीभाऊ कार्ले या तरुणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

​नेप्ती रोडवरील एकनाथ नगर भागात फिर्यादी गौरव कार्ले आणि त्यांचे मित्र निखिल देशमुख यांच्या लग्नाची मिरवणूक सुरू होती. ही मिरवणूक रात्री आठ वाजेच्या सुमारास सातपुते मळा परिसरात आली असता, आरोपी सागर सातपुते, भूषण गुंड, गणेश सातपुते आणि निलेश सातपुते यांनी मिरवणूक अडवली. “आमच्या घरासमोर राजकीय व्यक्तीचे गाणे का लावले?” असा जाब विचारत आरोपींनी वादाला सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

हे सुद्धा वाचा :  भाजप इन, राष्ट्रवादी आऊट; अहिल्यानगरच्या जागेवरून काय घडतंय पहा...

​या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपनिरीक्षक सेंदवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मिरवणुकीतील वादांमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

डोंगरगण येथे बाप-लेकावर लोखंडी गजासह लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: डोंगरगण परिसरातील गड मांजरसुंबा फाटा येथे एका हॉटेलसमोर जुन्या वादातून बाप-लेकास बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नामदेव आनंदा मते (वय ७४) आणि त्यांचा मुलगा पांडुरंग हे नेवासा येथून काम संपवून दुचाकीवरून घरी परतत होते. वांबोरी रस्त्यावरील आबासाहेब पठारे यांच्या दुकानासमोर ते थांबले असताना, आरोपी अमोल बाळासाहेब मते आणि महेश बापू मते हे त्या ठिकाणी आले. यावेळी आरोपींनी “तुला लई माज आला आहे, आज तुझा खेळच खल्लास करतो” असे म्हणत फिर्यादींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

​मुलाने शिवीगाळीचा जाब विचारला असता, दोन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अमोल मते याने हातातील लोखंडी गजाने पांडुरंग याच्या उजव्या हाताच्या मनगटावर जोरात प्रहार केला, तर महेश मते याने लाकडी दांडक्याने पाठीत मारहाण करून गंभीर दुखापत केली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीवर दगड आणि दांडके मारून नुकसान केले. “पुन्हा नादी लागलात तर अंगावर डंपर घालून मारून टाकू” अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दिवटे करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ