अहिल्यानगरमधील भक्ताकडून विठुमाउलीच्या चरणी 56 लाखांच्या सुवर्णपादुका अर्पण
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
यंदाच्या आषाढी एकादशीला भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटणार आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणी प्रथमच सुवर्ण पादुका अर्पण करण्याचा ऐतिहासिक योग जुळून आला आहे. अहिल्यानगर येथील एका अनामिक भक्ताने सुमारे अर्धा किलो वजनाच्या आणि अंदाजे 56 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पादुका विठ्ठलाला अर्पण केल्या आहेत.
यापूव विठ्ठलाला चांदीच्या पादुका होत्या. मात्र, सुवर्ण पादुका अर्पण करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती श्री विठ्ठल मंदिराच्या सोने-चांदी विभागाचे प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी दिली. या सुवर्ण पादुका घडविण्याचे काम रांका ज्वेलर्सने केले आहे. रांका ज्वेलर्सच्या चार कुशल कारागिरांनी अवघ्या आठ दिवसांत या पादुकांची निर्मिती केली. पादुकांवरील आकर्षक हस्तनक्षीही याच कारागिरांनी अत्यंत बारकाईने साकारली आहे. या पादुकांचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाच्या चरणांचे कोणतेही प्रत्यक्ष माप न घेता त्या तयार करण्यात आल्या.

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या सुवर्ण पादुका श्री विठ्ठलाच्या चरणी परिधान करण्यात आल्या असता त्या अगदी चपखल बसल्याचे राजेंद्र सुभेदार यांनी सांगितले. तसेच हिंदू धर्मातील प्रमुख सण आणि महापूजेच्या दिवशी या सुवर्ण पादुका विठ्ठलाला परिधान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी रांका ज्वेलर्सचे संचालक वास्तूपाल रांका यांनी ही सेवा आपल्या संस्थेसाठी अत्यंत भाग्याची आणि अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली. यापूवही रांका ज्वेलर्सला विविध देवस्थानांच्या सुवर्ण सेवेचे भाग्य लाभले असून, आता पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी खऱ्या अर्थाने चरणसेवा अर्पण करण्याची संधी मिळणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रसज्ज चांदीचा रथ
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा चांदीचा रथ साकारण्यात आला आहे. पारंपरिक सौंदर्य अबाधित ठेवत रथाचे वजन कमी करण्याचे आव्हान पेलण्यात यश आल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सुलभ होत आहे. माऊलींच्या रथाची निर्मिती केआरएफ अर्थात कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनी केली आहे. या नव्या रथाचे एकूण वजन सुमारे 2.8 टन आहे.










