नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जून 2026 रोजी होणार (NEET UG 2026 Re-Exam Schedule) आहे. याबाबत आज एनटीएकडून घोषणा करण्यात आली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती.
पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आलेली नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएकडून 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने पुढील प्रवेशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर तयारी करुन परीक्षा दिल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप निर्माण झाला होता. मात्र, आता लगेचच 21 जूनला नीट पुर्नपरीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो.
एनटीएने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ही परीक्षा देशभरात एकाच वेळी घेतली जाईल. विद्यार्थ्यांना आतापासूनच त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षा रविवारी होत असल्याने, केंद्र सरकार आणि एनटीएने कडक सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन
एनटीएने विद्यार्थी आणि पालकांसाठी एक विशेष इशाराही जारी केला आहे. संस्थेने म्हटले आहे की, परीक्षेबद्दल विविध दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मीडियावर पसरत असू शकतात. त्यामुळे, कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका.
विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की त्यांनी केवळ NTA च्या अधिकृत चॅनेल आणि वेबसाइटवर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.
अनधिकृत लिंक किंवा संदेशांद्वारे शेअर केलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका.
मदतीसाठी जारी केलेले हेल्पलाइन क्रमांक
जर कोणत्याही विद्यार्थ्याला त्यांच्या परीक्षा, केंद्र किंवा प्रवेशपत्रासंबंधी काही समस्या असतील, तर ते थेट नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी संपर्क साधू शकतात. या उद्देशासाठी अधिकृत ईमेल आणि फोन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
ईमेल आयडी: [email protected]
हेल्पलाइन क्रमांक: 011-40759000 आणि 011-69227700
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
तयारीसाठी वेळ: विद्यार्थ्यांकडे आता अंदाजे एक महिन्याचा वेळ आहे. तज्ञांचा सल्ला आहे की विद्यार्थ्यांनी केवळ उजळणी आणि सराव परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे.
परीक्षा केंद्रे: परीक्षा केंद्रांची यादी आणि वाटपासंबंधी माहिती विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि ईमेलवर देखील पाठवली जाईल.










