- जाहिरात -spot_img
breaking news

नगरमध्ये ५.८३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; साडेतीन लाखांचे दागिने लांबवले, कंपनीतून तांबे चोरले, खाजगी जागेवर अंत्यसंस्कार भोवले…

राजस्थानच्या तरुणाला पोलिसांनी केली अटक
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी पोलिसांनी निंबळक बायपास भागात मोठी कारवाई करत सुमारे ५ लाख ८३ हजार २०० रुपये किमतीचे २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील एका तरूणाला अटक केली आहे. आरोपीकडून गाडी आणि मोबाईलसह एकूण ११ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

गस्तीवर असताना पोलिसांना निंबळक बायपास येथील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ दोन गाड्या संशयास्पद उभ्या असल्याचे दिसले. पोलीस चौकशीसाठी पुढे गेले असता, एका गाडीतील दोघे जण पळून गेले. मात्र, पोलिसांनी दुसर्‍या विनानंबर स्विफ्ट कारजवळ उभ्या असलेल्या तरूणाला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव रविप्रकाश भेराराम बिश्नोई (वय २९, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले. संशय आल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली. तेव्हा स्विफ्ट कारच्या मागील सीटवर प्लास्टिकच्या पिशवीत आणि तीन पुड्यांमध्ये एकूण २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज सापडले. आरोपीने हे ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याचे मान्य केले आहे. पळून गेलेल्या दोन साथीदारांपैकी एकाचे नाव तांबे असल्याचे समोर आले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा ड्रग्जचा साठा राजस्थानमधून सोलापूरमार्गे अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, अंमलदार उमेश शेरकर, सचिन हरदास, सूरज देशमुख व अक्षय रोहोकले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गर्दीचा फायदा घेत साडेतीन लाखांचे दागिने लांबवले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील गर्दीच्या स्वस्तिक बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढताना एका महिलेचे साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वैशाली देवीदास कसाळ (वय ३४, मूळ रा. शेवगाव, सध्या रा. पुणे) या २४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्वस्तिक बसस्थानकातून एसटी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा गैरफायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दागिने अत्यंत हातोहातीने चोरून नेले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २ लाख रुपये किमतीचे १८ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण, ४० हजार रुपयांची पिळ्याची अंगठी, ७० हजार रुपयांचे सोन्याचे इअररिंग, ४० हजार रुपयांची कानातील रिंग आणि लहान बाळाची १० हजार रुपयांची सोन्याची वाळी असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. फिर्यादी वैशाली कसाळ यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सूर्यकांत डाके करत असून, बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  राहुरी विधानसभा पोटनिवडणूक, जिल्हाधिकाऱयांचा मोठा निर्णय, सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

ट्रान्सफॉर्मर कंपनीतून दोन लाखांचे तांबे लांबवले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहर परिसरातील अरणगाव रोडवर असलेल्या एका ट्रान्सफॉर्मर कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल २ लाख ४० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगरकर मळा, स्टेशन रोड येथे राहणारे गौरव संजय गाजरे (वय ३०) यांची अरणगाव रोडवरील हॉटेल सुरजसमोर अ‍ॅम्पीयर ट्रान्सफॉर्मर नावाची कंपनी आहे. २४ जुलै रोजी मध्यरात्री सुमारे २:२९ वाजता तीन अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील बाजूचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कंपनीत व्यवस्थित मोजून ठेवलेले तब्बल २०० किलो वजनाचे तांबे (कॉपर) पळवून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर गौरव गाजरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक नितीन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळके आणि सहाय्यक फौजदार सुनील सिरसाठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

भरधाव स्विफ्ट कारची बुलेटला धडक; केडगाव येथील तरुण जखमी
​अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा बेपर्वा वाहन चालविल्यामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. केडगाव येथील सैनिक कॉलनीच्या चौकात एका भरधाव स्विफ्ट कारने बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात बुलेटस्वार तरुण जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शनगर (केडगाव) येथील रहिवासी शुभम अशोक कुंदाडे (वय २२) हा तरुण आपल्या बुलेट मोटरसायकलवरून (क्रमांक MH 16 DA 7315) सक्कर चौकाकडून घराकडे जात होता. तो सैनिक कॉलनीच्या चौकात आला असता, उजव्या बाजूने आलेल्या एका ग्रे रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH 16 BH 8433) त्याला जोरदार धडक दिली.
​धडक इतकी भीषण होती की शुभम रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. त्यानंतरही कार चालकाने दुचाकी काही अंतरापर्यंत घासटत नेली. या अपघातात शुभमच्या दोन्ही पायांना मुका मार लागून तो जखमी झाला. स्थानिक तरुणांनी त्याला तात्काळ केडगाव येथील साई क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले.
​अपघात झाल्यानंतर स्विफ्ट कारचा अज्ञात चालक घटनास्थळावरून निघून गेला. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर शुभम कुंदाडे याने कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात स्विफ्ट कार चालकाविरुद्ध फिर्याद दिली. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  लोणी बुद्रुकचे तलाठी कार्यालय चोरट्यांनी फोडले

दिल्लीगेट परिसरात दोन गाड्यांच्या काचा फोडून ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
​दिवसाढवळ्या घडली घटना : वाहनांमधून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीस
​अहिल्यानगर : शहर आणि परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून दिल्लीगेट भागातील मनोवेध काउन्सलिंग सेंटर आणि लोकमत भवन जवळ उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून अज्ञात चोरट्याने रोकड व दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर श्रीकिसन शर्मा (वय ४० वर्षे, व्यवसाय: सरकारी नोकरी, रा. शारदानगर, कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी आपली चारचाकी गाडी मनोवेध सेंटरजवळ पार्क केली होती. २४ जुलै रोजी दुपारी १२:५० ते १:४५ या वेळेत अज्ञात चोरट्याने गाडीच्या डाव्या बाजूच्या मागील खिडकीची काच फोडली. गाडीत ठेवलेली ३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि २४ हजार रुपये किमतीच्या ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन रिंग असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवला.

​त्याच सुमारास जवळच उभ्या असलेल्या प्रकाश विठ्ठल वाळके यांच्या गाडीची मागील काच फोडून चोरट्याने महत्त्वाची बॅग चोरून नेली. या बॅगेत बँकेचे चेकबुक, ओळखपत्रे, वाहन परवाना तसेच बांधकामाशी संबंधित महत्त्वाची बिले व कागदपत्रे होती.
​या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी रामेश्वर शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (थ) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

खाजगी जागेत अंत्यसंस्कार; तिघांसह १५ जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी जागेत विनापरवाना व बेकायदेशीरपणे अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तीन जणांसह इतर १० ते १५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरणगाव शिवारातील नगर-दौंड रस्त्यावरील गट क्रमांकाच्या जागेत घडली.

हे सुद्धा वाचा :  आ. अक्षय कर्डिले यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट.. काय कारण

​मिळालेल्या माहितीनुसार, संजय रुपचंद ताथेड (वय ५८, रा. जैनपार्क, अहिल्यानगर) यांच्या मुलीच्या मालकी हक्काची आरणगाव शिवारात जागा आहे. आरोपी उषा सुदाम कांबळे, डायना सुदाम कांबळे आणि विनोद शिंदे (सर्व रा. मुंबई) तसेच त्यांच्यासोबत असलेल्या १० ते १५ लोकांनी मालकाची कोणतीही परवानगी किंवा संमती न घेता या जागेवर बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सुदाम महादेव कांबळे यांचे प्रेत त्या जागेत दफन करून अतिक्रमण केले.

​याप्रकरणी संजय ताथेड यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गागुंडे हे करत आहेत.

कामावर का गेला नाही विचारल्याचा राग: पतीने पत्नीला पट्ट्याने मारले
​अहिल्यानगरमधील बुऱ्हाणनगर भागातील घटना; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – अहिल्यानगर परिसरातील बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पती कामावर का गेला नाही असा साधा प्रश्न विचारल्याचा राग आल्याने पतीने हे कृत्य केले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असून सध्या अहिल्यानगरमध्ये भाड्याच्या घरात राहते. २४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास, पत्नीने पतीला कामावर न जाण्याबाबत विचारणा केली. याचा राग येऊन पतीने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कमरेच्या पट्ट्याने डोक्यात मारून दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

​या घटनेनंतर दुखापतग्रस्त महिलेवर अहिल्यानगर येथील नागरी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलिसात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोहन भेटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ