माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे टीका
पारनेर | नगर सह्याद्री
नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे यांनी पारनेर शहरातील विविध विकासकामे, देवी भोयरे फाटा ते खडकी या रस्त्याचे काम, पाणी योजना, नगरपंचायतीची भूमिका तसेच स्थानिक आणि वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर परखड भाष्य करत अनेक मुद्द्यांवर थेट टीका केली. पारनेर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शहराच्या विकासाला राजकारणाच्या आड येऊ देऊ नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
चेडे म्हणाले की, देवीभोयरे फाटा ते खडकी यादरम्यान पारनेर शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून पारनेरकरांनाच आंदोलन करावे लागल्याची खंत व्यक्त केली. रस्ता रोको आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आ. काशिनाथ दाते, खा. नीलेश लंके व सुजित झावरे तसेच इतर राजकीय नेत्यांनी नगरपंचायतीमध्ये बैठका घेतल्या. मात्र, सर्व लोकप्रतिनिधी स्वतःच्या राजकारणासाठी पारनेर शहरवासियांना वेठीस धरण्याचे काम करत असून, त्यामुळे शहर विकासापासून वंचित राहत आहे. गेल्या साडेतीन ते चार वर्षांपूव पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता आली, मात्र शहराची महत्त्वाची पाणी योजना कुठे अडकली आहे, असा सवाल केला. पाणी योजनेच्या फाईलचा मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आवश्यक तो पाठपुरावा होताना दिसत नाही. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी त्यांच्या अधिकारांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे, असे मतही चेडे यांनी व्यक्त केले.
पारनेर शहर कोणत्या दिशेने जात आहे, स्थानिक नेतृत्व पुढे का येत नाही किंवा त्याला पुढे येऊ दिले जात नाही का, याचाही विचार करण्याची गरज आहे. शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर वरिष्ठ राजकीय नेते त्यांच्या राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
खा. लंके 150 कोटी रुपये, आ. दाते 18 कोटी रुपये आणि सुजित झावरे पाटील आठ कोटी रुपये निधी पारनेर शहरासाठी आणल्याचा दावा करतात. मात्र, हा निधी पारनेर नगरपंचायतीच्या नावाने आणि लोकसंख्येच्या निकषावर मिळणारा निधी असल्याचे सांगत तो पारनेरकरांचाच अधिकार असल्याचे चेडे यांनी स्पष्ट केले.
विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन फलकांवर स्थानिक नगराध्यक्षांचे फोटो नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
रस्ता रुंद करा; पण डिव्हायडर टाळा
देवी भोयरे फाटा ते खडकी रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना चेडे यांनी काही सूचना मांडल्या. स्थानिक बाजारपेठेचा विचार करून रस्त्यालगतची अतिक्रमणे पूर्णपणे हटवून रस्ता अधिक रुंद करण्यात यावा. मात्र शहरातील मुख्य बाजारपेठेत मध्यभागी डिव्हायडर उभारू नये. डिव्हायडरमुळे व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना अडचणी निर्माण होऊ शकतात. बाजारपेठेच्या विस्तारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सांगितले.
इतर गावांत बैठका नाहीत, मग पारनेरमध्येच का?
रस्त्याचे काम बेल्हे, आळकुटी, देवी भोयरे फाटा, वडझिरे, चिंचोली आदी गावांमधूनही सुरू आहे. त्या गावांमध्ये अशा बैठका घेण्याची वेळ आली नाही, मग पारनेर शहरातच वारंवार बैठका का घेतल्या जात आहेत, असा सवाल करत पारनेर शहरातील नागरिक विकासकामांना विरोध करत नाहीत, मग शहरालाच वेठीस धरण्याचे राजकारण का केले जाते, असा प्रश्नही चेडे यांनी उपस्थित केला.










