- जाहिरात -spot_img
breaking news

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा, रुग्णांना बाहेरून औषधे खरेदीची वेळ

प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
पाथर्डी | नगर सह्याद्री
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसांपासून आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. त्यामुळे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना औषधे बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला दिला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

मिरी येथील एका पालकाने त्यांच्या २० महिन्यांच्या मुलीला उलटीचा त्रास होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, आवश्यक औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी पांगरमल (ता.नगर) येथील एका महिलेला प्रसूतीनंतर तपासणीसाठी आल्यानंतर लागणारी औषधे बाहेरून आणण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही अनेक रुग्णांनी खोकल्याची औषधे, लहान बाळांची औषधे तसेच कुत्रा चावल्यानंतर आवश्यक असलेली लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांसाठी मुख्य आरोग्य केंद्र मानले जाते. मात्र येथेच औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

औषधांची कमतरता असताना काही तपासण्या देखील खासगी पातळीवर बाहेरून करण्यास सांगितले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी आहे की केवळ नावालाच, असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने मिरीसह तालुयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शयता व्यक्त होत आहे.

औषध साठा संपल्यानंतर वेळोवेळी जिल्हास्तरावर मागणी केली जाते. मात्र जिल्हा पातळीवरही साठा उपलब्ध नसल्यास काही वेळेस औषधे देता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून काही औषधे बाहेरून घेण्यास सांगावे लागते. तसेच खोकल्याची औषधे हे अल्प प्रमाणात मिळत असल्याने अनेक रुग्ण आवश्यक नसताना मागणी करतात. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन गरजवंतांनाच औषध दिले जाते.
– डॉ. सोनाली पवार, वैद्यकीय अधिकारी, मिरी

हे सुद्धा वाचा :  खर्डा येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांना अटक

औषध खरेदी प्रक्रिया जिल्हा व राज्य स्तरावर होत असल्याने स्थानिक पातळीवर तात्काळ उपलब्धता करणे शय होत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून वेळोवेळी मागणी केली जाते. मात्र जिल्हा स्तरावरही साठा उपलब्ध नसल्यास काही अडचणी निर्माण होतात. आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. परंतु तरीदेखील औषध साठा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाकडे औषधांची मागणी करावी. तसेच अत्यावश्यक गरज असल्यास रुग्णांनी जिल्हा रुग्णालयाचा पर्याय वापरावा.
  – डॉ. भगवान दराडे, तालुका आरोग्य अधिकारी, पाथर्डी

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ