अपूर्ण रस्ताकामामुळे वाहन धारकांचे हाल
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील जातेगाव ते राळेगण सिद्धी या महत्त्वाच्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. अपूर्ण रस्ताकाम, निम्म्या भागात झालेले खडीकरण आणि सर्वत्र पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे वाहनधारक, विद्याथ, शेतकरी व नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
जातेगाव ते राळेगण सिद्धी हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शाळा, कॉलेजचे विद्याथ, व्यापारी, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.रस्त्याच्या अनेक भागात मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून, सैल खडी आणि खोल खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. चारचाकी वाहनांचेही मोठे नुकसान होत असून, वाहन धारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.रस्त्याच्या निम्म्या भागात केवळ खडीकरण करून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. त्यामुळे उडणारी धूळ, असमतोल रस्ता आणि खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. आगामी पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित विभागाचे लक्ष वेधले, मात्र अद्याप कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. रखडलेल्या व निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. संबंधित कंत्राटदाराविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
अण्णा हजारेंच्या गावाकडील रस्त्याची वाट बिकट
जातेगाव ते राळेगण सिद्धी हा मार्ग देशभरात आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगण सिद्धीकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, याच रस्त्यावर आज मोठमोठे खड्डे पडले असून अपूर्ण कामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आदर्श गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचीच अशी अवस्था असेल, तर सामान्य भागातील विकासाची परिस्थिती काय असेल? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तातडीने काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
खराब रस्त्याचा विद्यार्थ्यांना फटका
पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, घाणेगाव, म्हसणे आणि जातेगाव या परिसरातील मोठ्या प्रमाणातील विद्याथ शिक्षणासाठी दररोज राळेगण सिद्धीकडे ये-जा करतात. मात्र, जवळपास वर्षभरापासून खराब झालेल्या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, अपूर्ण काम आणि खडीकरणामुळे विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास धोकादायक बनला आहे. शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.










