नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत ५ जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला आहे. अवघ्या १५ मिनिटांत दरोडेखोरांनी बँकेतील ६ कोटींहून अधिक किमतीचे सोने आणि रोकड लंपास केली. झारखंडमधील बरही येथील शाखेत शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे, मात्र दरोडेखोर अद्याप फरार आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी बरही शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत सशस्त्र गुन्हेगारांनी हा धाडसी दरोडा टाकला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जणांच्या टोळीने दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नियोजनबद्ध रितीने हा दरोडा टाकला. बँकेचे उपव्यवस्थापक रौशन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दोन तरुण चालू खाते (Current Account) उघडण्याच्या बहाण्याने शाखेत शिरले. त्यानंतर काही वेळातच त्यांचे इतर ३ साथीदार तिथे पोहोचले.
या पाचही जणांनी शस्त्रांचा धाक दाखवून कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस धरले. कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. एखाद्या चित्रपटासारखा अवघ्या १५ मिनिटांत दरोडेखोरांनी बँकेवर डल्ला मारला आणि पसार झाले.
दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना एका खोलीत कोंडून तिजोरीच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर सुमारे ४ किलो सोने आणि ५ लाख रुपयांची रोकड घेऊन त्यांनी पळ काढला. या सोन्याची किंमत ७ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कोणालाही पाठलाग करता येऊ नये, यासाठी दरोडेखोरांनी पळून जाताना बँकेला बाहेरून कुलूप लावले होते.










