न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये ‘व्यसनमुक्त पारनेर , सुंदर पारनेर’ कार्यक्रम
पारनेर | नगर सह्याद्री
आजच्या तरुण पिढीसमोर अनेक प्रकारची प्रलोभने आहेत, परंतु विद्यार्थ्यांनी स्वतःला सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर ठेवून केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आयुष्यात काही करायचेच असेल, आणि व्यसन करायचेच असेल, तर ते नशिल्या पदार्थांचे नव्हे, तर वाचनाचे व उज्ज्वल ध्येयाचे करा. ध्येयाचे व्यसन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल,असा मोलाचा सल्ला पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी दिला.
देशातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत स्थानिक न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, पारनेर कनिष्ठ विभाग व्यसनमुक्त पारनेर, सुंदर पारनेर या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर हे होते.
याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनीही विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती दिली. व्यसनाधीनतेमुळे तरुण नकळत गुन्हेगारीकडे कसा वळतो, हे स्पष्ट करताना त्यांनी एक आगळावेगळा सल्ला दिला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात एकदा तरी जेलला (कारागृहाला) भेट दिली पाहिजे. जेलमधील कैद्यांचे खडतर जीवन, त्यांना मिळणारी कठोर वागणूक आणि तिथला थरार प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कोणताही सुजाण विद्याथ आयुष्यात कधीही गुन्हा करण्याची हिंमत करणार नाही.










